
>> राकेश बापट, अभिनेता
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीची सुबक मूर्ती घरी साकारणे… हा एक आनंददायी सोहळा… हल्ली स्वहस्ते गणपतीची बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी बाप्पाची मूर्ती बनवण्यात मग्न आहे. पारंपरिक गणेशमूर्ती शाळेत असल्यापासूनच मी घरी बनवू लागलो. आम्ही पुण्याला राहायचो. तिथे आमच्या घरामागे एका डोंगराजवळ दत्त महाराजांचं स्वयंभू दत्त मंदिर होतं. त्या मंदिराचे व्यवस्थापक दिनकरकाका होते. मंदिराशेजारीच त्यांचं घर होतं. तिथे ते गणपतीमूर्ती बनवायचे. हे माझ्या आईने पाहिलं होतं. मला शिल्पकला आणि चित्रकलेची आवड असल्यामुळे तिने मला ते मूर्ती कशी बनवतात ते पाहायला जाण्याविषयी सांगितलं. तेव्हापासून मी शाळेतून आल्यावर दररोज काकांकडे मूर्ती कशी बनवतात. ते पाहायला जायचो. एकाग्रतेने ते बनवत असलेल्या मूर्तींचं निरीक्षण करायचो. त्यांचं बनवणं बघत बघतच स्वतः मूर्ती बनवायला शिकलो. त्यानंतर घरची मूर्ती स्वतःच बनवून लागलो. ही प्रथा आजतागायत सुरू आहे.
मूर्ती मातीची असते, त्यामुळे माती सुकण्यापूर्वी मूर्ती पूर्ण करावी लागते. मूर्ती पोकळ असली तरीही एक फुटाच्या एका मूर्तीचं वजन 50 किलो होऊ शकतं. मूर्तीवर मातीचे थर ती ओली असतानाच रचावे लागतात. आधी मांडय़ा, पोट, छाती, धड, त्यानंतर हात असे अवयव तत्परतेने साकारावे लागतात. नाहीतर त्यांना तडा जाऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूला कोणाचा धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. माती मातीतच जाते. शाडू मातीच्या गणपतींचं विसर्जन घरीही करता येतं. मी नैसर्गिक रंग वापरतो. कारण सध्या प्रदूषणामुळे मोठय़ा प्रमाणात वातावरण दूषित होतय. त्यामुळे लोकांनी व्यावसायिक मूर्तीकाराकडून मूर्ती विकत घेताना त्या नैसर्गिक रंग आणि शाडू मातीच्या आहेत का, ही माहिती घ्यवी. कारण मूर्ती शाडू मातीची असली तरी त्यासाठी वापरलेले रंग रसायनयुक्तच असतात. ते समुद्चां पाणी दूषित करतात. त्यामुळे मूर्ती घेताना शाडू माती आणि नैसर्गिक रंग वापरले आहेत का, याची माहिती करून घ्यावी, हा माझा गणेशभक्तांना सल्ला आहे.
मूर्तीच्या दागिन्यांसाठी वापरण्यात येणारे रंग रसायनयुक्त असल्यामुळे मी मूर्तीसाठी जास्त दागिने करत नाही शिवाय प्लास्टिकचा वापरही करत नाही. पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. विसर्जन न करता घरी टबमध्ये विसर्जन करतो. मोठय़ा मूर्तींना दागिने घालून आपण सजवतो, पण त्यांचं समुद्रात विसर्जन करताना प्लास्टर ऑफ पॅरिस विरघळत नाही. अशा मूर्तींचे अवशेष समुद्राबाहेर फेकले जातात, हे मला अजिबात आवडत नाही.
घरी बनवत असलेल्या मूर्तीचा आकार, त्याचं स्वरुप दरवेळी बदलत असतं. मूर्ती बनवण्यासाठी माती कालवताना ती कशी घडवायची हे मला आपसूकच सुचत. मी आधीच काहीही ठरवून ठेवत नाही. त्यामुळे मूर्ती बनवण्याची प्रक्रिया माझ्याकडून आपोआप घडून येते.
माझ्या मूर्ती कलेतून प्रेरणा घेऊन माझे काही मित्रही माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायची हे शिकायला येऊ लागले आहेत. तेही स्वतः बनवलेली गणपतीची मूर्तीच यावर्षी पूजेसाठी घरी बसवणार आहेत. तसेच हल्ली स्वहस्ते बाप्पा बनवण्याची आवडही वाढू लागली आहे, अशा नव्या मूर्तीकारांना माझा सल्ला आहे की, अशीच स्वहस्ते मूर्ती घडवत राहा. ती साकारताना पर्यावरणाचा ऱहास होणार नाही याचीही काळजी घ्या.
सुबक… सुंदर बाप्पा
मी घरीच साकारतो…
बाप्पा जेव्हा आपल्या
हातून प्रकटतो तेव्हाचा आनंद वेगळाच असतो…
आनंदमय प्रवास…
बाप्पाची मूर्ती साकारत असताना मनात खूप आनंद जाणवत असतो. ज्याप्रमाणे आपण देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो त्याप्रमाणे मूर्ती बनवणं ही माझ्यासाठी एक प्रार्थना आहे. या दिवसांत मी स्वतःच्या आत बघायला शिकतो. तसेच आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तर कधीही न उलगडणारी असतात. ती मला या काळात त्याला घडवताना मिळत जातात. त्याला साकारणे ही मला एक तपस्या वाटते. त्यामुळे मूर्ती घडवताना होणारा माझा प्रवास आनंदमय असतो.


























































