
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका होणार आहे. घरामध्ये वादाचे फुटलेले पेव आणि बदलणारी समीकरणं असतानाच, आता मनोरंजनाचा ‘कहर’ करायला डॅशिंग क्वीन राखी सावंत हिची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री झाली आहे. राखीच्या येण्याने घरातील सदस्यांची झोप उडणार असून खेळाला आता एक वेगळंच वळण मिळणार आहे.
राखी सावंत म्हणजे नुसता ड्रामा नाही, तर ती मनोरंजनाचं एक वादळ आहे. आतापर्यंत घरात तयार झालेली नाती, गटबाजी आणि रणनीतीवर राखीचा मोठा प्रभाव पडणार आहे. ती कोणाशी मैत्री करणार आणि कोणाशी पंगा घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राखीचा बिनधास्त स्वभाव आणि बेधडक खेळ यामुळे घरातील प्रत्येक सदस्याचा गेम आता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
आपल्या एन्ट्रीबद्दल बोलताना राखी सावंतने नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगितले की, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. आता घरात राखीची मर्जी चालणार! प्रेक्षकांना माझे नवनवीन कॉस्च्युम्स आणि माझा अनोखा खेळ पाहायला मिळेल.”



























































