
सामना ऑनलाईन । डेहराडून
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी मोदी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी तमाम हिंदूंकडून होत आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आधी 2019ची लोकसभा निवडणूक, मग राममंदिर अशी भूमिका मांडली आहे. डेहराडून येथे संघाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवडणुकीनंतर केंद्रात कोणाचीही सत्ता येऊ द्या, राममंदिर बांधणारच, असे स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा मुद्दा नको म्हणून चार महिने आंदोलन पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. आज सरसंघचालकांनी भूमिका मांडली आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत झालेल्या निर्णयानुसारच राममंदिर निर्माण होणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता कोणाचीही येऊ द्या, राममंदिराचे काम सुरू करण्यात येईल, असे भागवत म्हणाले. या कार्यक्रमात आरक्षणाच्या मुद्दय़ावरही सरसंघचालकांनी मते मांडली. संघ आरक्षणाच्या विरोधात नाही. पण आरक्षणाचा फायदा गरजू लोकांना मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
राममंदिर आणि गोरक्षा हिंदू संस्कृतीचा आधार
सरसंघचालक भागवत यांनी राममंदिर निर्माणाची तारीख सांगितलेली नाही. राममंदिर आणि गोरक्षा हे हिंदू संस्कृतीचे आधार आहेत, असे ते म्हणाल्याची माहिती संघाच्या एका नेत्याने दिली. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तशा ढोंगी धर्मनिरपेक्ष राजकीय शक्ती गोळा होऊ लागल्या आहेत. संत समाज रामजन्मभूमीचा मुद्दा राजकीय होऊ देणार नाही, अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच धर्मसंसदेत मांडल्याचे या संघनेत्याने सांगितले.




























































