
रामजन्मभूमी न्यासाची भूमिका
राममंदिर उभारण्यासाठी आधीच रामजन्मभूमी न्यास अस्तित्वात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून केंद्र सरकारने दुसरा ट्रस्ट स्थापण्याची गरज नाही अशी भूमिका रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी बुधवारी मांडली. या भूमिकेवर राममंदिराशी संबंधित इतर संस्थांनी मात्र आक्षेप घेतला आहे.
रामजन्मभूमी न्यास ही विश्व हिंदू परिषदेमार्फत चालवली जाणारी संस्था आहे. आम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या रामजन्मभूमी न्यासातच बदल करू. त्यात गरजेनुसार नवीन सदस्यांना सहभागी करून घेऊ, असे महंत नृत्य गोपाल दास यांनी स्पष्ट केले. न्यासाच्या या भूमिकेला दिगंबर आखाडय़ाचे प्रमुख महंत सुरेश दास यांनी विरोध केला. सरकारने मंदिर उभारणीसाठी नवीन ट्रस्ट स्थापन करावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रामजन्मभूमी न्यासाच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेत ट्रस्ट स्थापणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
ट्रस्ट स्थापण्याच्या बाजूने निर्मेही आखाडा, विहिंप
निर्मोही आखाडय़ाचे प्रमुख महंत दिनेंद्र दास तसेच विहिंपचे त्रिलोकी नाथ पांडय़े यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून नवीन ट्रस्टची स्थापना झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये दाखल व्हायचे की नाही हा निर्णय मात्र आमचा असेल, असे निर्मोही आखाडय़ाचे प्रमुख महंत दिनेंद्र दास यांनी स्पष्ट केले. याचवेळी विहिंपने नवीन ट्रस्टमध्ये सरकारचेही प्रतिनिधी असले पाहिजेत, असे म्हटले आहे.


























































