
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. यासाठी केंद्र सरकारने स्थापलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक येत्या 19 फेबुवारीला नवी दिल्लीत होणार आहे. बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष, महामंत्री आणि कोषाध्यक्ष यांच्या निवडीबरोबरच मंदिर उभारणीचा मुहूर्तही जाहीर होण्याची शक्यता आहे.
ट्रस्टमधील पाच जागा अजूनही रिक्त आहेत. या सदस्यांच्या निवडीचा फैसला पहिल्या बैठकीत होणार आहे. मंदिर आंदोलनाचे नेतृत्व केलेल्यांना ट्रस्टमध्ये स्थान न दिल्यामुळे संतांमध्ये नाराजी आहे. तसेच ओबीसी नेत्यांनीही ट्रस्टवर उघड नाराजी प्रकट केली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारने 5 फेबुवारीला मंदिर ट्रस्ट स्थापनेची घोषणा केली होती. त्यात 15 सदस्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. 92 वर्षीय ज्येष्ठ वकील के. पराशरण यांच्या नेतृत्वाखालील या ट्रस्टचे कामकाज चालणार आहे. मंदिर उभारणीसंबंधी निर्णय घेण्यास हा ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे.
दोन वर्षांत मंदिर उभारणार
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर पुढील दोन वर्षांत म्हणजेच 2022 पर्यंतच पूर्ण केले जाईल, असा दावा ट्रस्टी कामेश्वर चौपाल यांनी केला आहे. सर्वप्रथम 67 एकर जमिनीचे मोजमाप करून ती समतोल केली जाईल. मग शिलान्यास केला जाईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाईल. मंदिरासाठी आणखी जमिनीची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.




























































