कधी ‘देव’ तर कधी ‘दानव’, रामायण मालिकेत बहुरंगी भूमिका करणारा कोण आहे हा मानव?

5174

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आधी 14 एप्रिल आणि त्यानंतर 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात लोकांना घरात खिळवून ठेवण्यासाठी दूरदर्शनने जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेतला. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ आणि बीआर चोप्रा निर्मित ‘महाभारत’ या मालिकांचे दूरदर्शनवर सध्या पुनःप्रसारण सुरू आहे. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता सुरू केलेल्या या मालिकांमुळे दूरदर्शनचा टीआरपी प्रचंड वाढला आहे. सध्या टीआरपीमध्ये ‘रामायण’ ही मालिका टॉपवर असून जुन्या पिढीसह नवीन पिढीचे लोकही काही काळासाठी टीव्हीसमोर बसलेले दिसतात.

सध्या सर्वत्र रामायण या मालिकेचे आणि त्यातील पात्रांची चर्चा सुरू आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच दरम्यान या मालिकेत बहुरंगी भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याचे फोटो व्हायरल होत आहेत. मालिकेत कधी ऋषी, कधी देव तर कधी दानव यांची भूमिका साकारणारा हा अभिनेता आहे तरी कोण याबाबत लोकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. एकाच मालिकेत अनेक रोल करणारा हा अभिनेता आहे असलम खान.

कधी ऋषी, तर कधी वानर, कधी देव तर कधी दानव, कधी गुप्तहेर तर कधी निशाचर अशा अनेक भूमिकेत असलम खान दिसत आहेत. तसेच समुद्र देवाची देखील भूमिका त्यांनी साकारली. बहुरंगी भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेक मीम्स तयार होत असून फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर या महोदयांची चर्चा आहे. याच दरम्यान एका युट्युब चॅनेलशी बोलताना असलम खान यांनी उमेदीच्या काळातील अनेक किस्से सांगितले.

images-5

असलम खान यांचा जन्म 1961 ला झांसी येथे झाला. एक वर्षाचे असताना ते कुटुंबासोबत मुंबईला आले. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. मुंबईतच असलम यांचे शिक्षण झाले आणि वयाच्या 19-20 व्या वर्षी ते नोकरीचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना अभिनयात विशेष रुची नव्हती. मात्र त्यांचा एक मित्र ‘यात्री’ थिएटर ग्रुपमध्ये कामाला होता. तसेच ‘विक्रम आणि वेताळ’ या मालिकेत छोट्या-मोठ्या भूमिका करत होता. त्यांच्या मित्राने त्यांना शूटिंगला नेले आणि याच दरम्यान एका नव्या भूमिकेसाठी नवा चेहरा हवा होता. दिग्दर्शकाने त्यांना एक संवाद बोलून दाखवण्यास सांगितला आणि इथूनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

रामायणात एन्ट्री
रामायण मालिकेत भगवान शंकर आणि वाल्मिकी ऋषी यांची भूमिका करणारे विजय काविश हे विक्रम आणि वेताळ मालिकेचे असिस्टंट डायरेक्टर होते. असलम यांना रामायणात एन्ट्री मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती. यामुळे त्यांना रामायणात ‘संत एकनाथ महाराज’ यांची भूमिका मिळाली. यानंतर त्यांनी एकामागून एक भूमिका साकारण्याचा सपाटा लावला. कधी नगरातील नागरिक, तर कधी सेनापती, तर कधी राक्षस अशा भूमिका त्यांनी केल्या. याच मालिकेत समुद्र देव साकारण्यासाठी बोलावण्यात आलेला कलाकार ऐनवेळी आजारी पडला आणि त्याच्या जागी असलम खान यांची वर्णी लागली.

fb_img_1587978140936_copy_700x450

अनेक मालिका गाजवल्या
रामायण या मालिकेसह असलम खान यांनी अरुण गोविल यांच्या ‘मशाल’, ‘अलिफ लैला’, ‘ये हवाये’ या मालिकेत काम केले. रामायण मालिकेप्रमाणे ‘अलिफ लैला’ या मालिकेतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. रामानंद सागर याचे आवडते असणारे असलम खान यांना त्यांनी ‘कृष्णा’ या मालिकेत अंध व्यक्तीचा रोल दिला होता. तसेच द्वारपालची भूमिका देखील त्यांनी साकारली. यासह ‘जय माता की’ मालिकेत त्यांनी दुर्वासा ऋषीचीही भूमिका केली.

screenshot_2020-04-27-14-32-29-550_com-facebook-katana_copy_700x450

2002 ला टीव्ही इंडस्ट्रीला रामराम
2002 ला असलम खान यांनी टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्रीला रामराम केला आणि झांशीला निघून गेले. इथे ते एका कंपनीत काम करू लागले. आता त्यांच्या भूमिकेवर व्हायरल होणारे मीम्स पाहून ते भावुक झाले आणि त्याकाळी सोशल मीडिया असता तर मी अधिक प्रसिद्ध झालो असतो व काही चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या