
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
रत्नागिरीचा सुपुत्र…घरात वडिलांनी जपलेली संगीत परंपरा अभिनयातून पुढे घेऊन जाणारे अभिनेते रमेश भाटकर यांचे मूळ गाव भाट्ये. मुंबईत चंदेरी दुनियेत वावरताना गावची प्रचंड ओढ असलेला कोकणी माणूस, गावात शिमग्यात फाका देत पालखी नाचवणारा, पुतण्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणारा, मेकअपच्या आड लपलेलं त्याच वेगळं रुपाने जगाच्या रंगमंचाचा निरोप घेतलाय. भाट्यात आपलं घरं बांधावं ही त्यांची इच्छा अपुरी राहिलीय. आर्किटेक्टने घराचा आराखडा तयार केला होता पण त्यापूर्वीच रमेश भाटकर यांनी एक्झीट घेतली.
तेव्हा भाटकर म्हणाले होते, शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायचंय
अभिनेते रमेश भाटकर यांच्या आडनावातच भाट्ये गावची ओळख होती. भाट्येतील भाटकर म्हणून लोक अभिमानाने सांगत. मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असलेले अभिनेते रमेश भाटकर यांची नाळ कोकणाशी जुळली होती. कोकणातून मुंबईत गेलेला माणूस किंवा मुंबईतच लहानाचे मोठे झालेली माणसं कोकण अॅडिक्ट असतात अगदी तसेच रमेश भाटकर कोकण अॅडिक्ट होते. भाट्यात घर बांधायचं त्यांचं स्वप्न होतं. घराच्या कामासाठी रमेश भाटकर आपल्या सभोवतीचं मखमली आवरण सोडून सामान्य माणसांप्रमाणे ते रत्नागिरीच्या तहसीलदार कार्यालयात फिरताना, जयस्तंभ येथील दुकानात मराठी पत्र टायपिंग करून घेताना रत्नागिरीकरांनी त्यांना पाहिलं होतं. त्यावेळीही त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडला होता. कॅप्टन दिलीप भाटकर यांच्यासोबत त्यांनी काताळे येथील फ्लोटिंग जेटीला भेट दिली होती. कोकणातील एकांकिका स्पर्धा किंवा राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटन प्रसंगी रमेश भाटकर हक्काचे पाहुणे होते. वरवडे येथे चित्रीत झालेल्या मालिकेत प्रमुख भूमिका त्यांनी केली होती. तेव्हा त्यांना रत्नागिरीतील अनेक कलाकारांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.
रमेश भाटकर यांचे चुलत भाऊ कॅ.दिलीप भाटकर म्हणाले की, वडिलांनी ज़े गावकडचं नातं जपलं होतं तेच नातं रमेश भाटकर यांनी जपलं. माझ्या मुलाच्या लग्नात रमेश भाटकर नाचला होता, इतका गावाशी तो एकरूप झालेला असायचा. काताळे पोर्ट पहाण्यासाठी तो त्याच्या मुलग्याला घेऊन आला होता. मुलगा अमेरिकेत पीएचडी करत होता. त्या दोघांचा आम्ही सत्कार केला तेव्हा त्याने भावूक उद्गार काढले की, माझ्या वडिलांनी संगीतक्षेत्रात आणि मी अभिनयात नावं केलं पण आमच्या दोघांचा सत्कार कधी एकत्र झाला नाही पण माझ्या मुलाचा आणि माझा सत्कार होतोय अशी आठवण दिलीप भाटकर यांनी सांगितली.


























































