
कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 1 ला जाण्यासाठी बंद केलेला रॅम्प अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शिवडी, कॉटन ग्रीन परिसरातील प्रवाशांची गैरसोय टळणार असून हा रॅम्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी शिवसेनेने वारंवार पालिकेकडे पाठपुरावा केला होता.
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाला जोडणाऱया पादचारी पुलाच्या नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी गेल्या महिन्यात पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांना पत्र लिहीत होत असलेल्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर पालिकेने नेमलेल्या पंत्राटदारामार्फत संबंधित काम प्रगतिपथावर असून गर्डर बनविण्याचे काम फॅब्रिकेशन कारखान्यात सुरू आहे, असे पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांनी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जोडणारा रस्ता (रॅम्प / जिना) 10 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून पादचारी पुलाचे उर्वरित काम 30 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न आहे, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जाण्यासाठी रॅम्प अखेर खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.































































