
पाण्याचे थेंब उडाले म्हणून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे घडली आहे. हाणामारी इतकी गंभीर झाली की त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूरच्या चकेरी जिल्ह्यातील जाजमऊ येथे हा प्रकार घडला. रविवारी रात्री वाजिदपूर येथील रहिवासी असलेला पिंटू निषाद नावाचा तरुण या परिसरातून चालला होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ दीपक आणि मित्र संदीप हेही होते. त्याने वाटेत पिण्यासाठी पाण्याचं पाऊच घेतलं.
पाण्याच्या पाऊचमधून काही थेंब परिसरातच राहणाऱ्या एका अमान नावाच्या तरुणाच्या अंगावर पडले. या क्षुल्लक कारणावरून अमान आणि त्याच्या साथीदारांनी पिंटूसह अन्य दोघांशी मारामारी करायला सुरुवात केली. दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू असल्याचं पाहून तिथे आणखी काही लोक जमले आणि त्यांनी देखील हाणामारी करायला सुरुवात केली.
पाहता पाहता हे प्रकरण इतकं गंभीर झालं की लोकांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत पिंटू गंभीर जखमी झाला. त्याला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पिंटूच्या मृत्युची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर प्रकरण आणखी गंभीर झालं. या प्रकारामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला. अखेर प्रशासनाने मध्ये पडत पोलीस बंदोबस्त तैनात केला.
पिंटूच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अमानने पिंटूला त्रास दिला होता. मात्र, पोलिसात तक्रार करूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पिंटूच्या मृत्युवर शोक व्यक्त करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणी ताबडतोब कारवाई करून आरोपींना अटक करण्याचे आदेशही दिले आहेत.

























































