रामसर यादीत नांदूरमधमेश्वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सतीश नागेश गोगटे

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याचा रामसर यादीत समावेश झाला आहे. 25 जानेवारी रोजी हे जाहीर झाले. जगातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळ जागांचा समावेश ‘रामसर’ यादीत केला जात असतो. हा एकप्रकारे जागतिक बहुमानच आहे. तो नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. अशाप्रकारे मानांकन मिळालेली हे देशातील अठ्ठाविसावे आणि महाराष्ट्रातील पहिलेच स्थळ आहे.

रामसर या जागतिक मान्यताप्राप्त अशासकीय संस्थेतर्फे जगातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळ जागांचे मानांकन केले जाते. या पद्धतीने जगातील अनेक पाणथळ जागांचा रामसर यादीत समावेश झाला आहे. त्यात आता महाराष्ट्रातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याची भर पडली आहे.

‘रामसर’ला Bird life International, IUCN. IWMI, WWF Je Ketland International या पाच जागतिक संस्थांचे पाठबळ आहे. रामसरचा महत्त्वाचा हेतू पाणथळ जागांचा ‘हुशार वापर’ (वाईज यूज) स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कार्याने व आंतरराष्ट्रीय सहकार्याने घडवून आणणे हा होय. यामध्ये स्थानिक लोक, संस्था, संघटना, कंपन्या यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. पाणथळ जागेचा वापर मानवाने कोणत्याही प्रकारचा स्वतःसाठी, कुटुंबासाठी, संस्थेसाठी न करता त्यातून होणारा उपसा व सांडपाणी निस्सारण यास पूर्णपणे बंदी आहे. त्याचबरोबर मासेमारी, जमीन, वाळू, पाणी यांचा उपसा करणे, वृक्षतोड, शेती करणे तसेच संपूर्ण जैवविविधतेचे संरक्षण करणे ही काही महत्त्वाची कलमे आहेत.

नांदूरमधमेश्वर अभयारण्य गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमावर आहे. साधारण 800 + हेक्टर जागेवर उथळ पाणथळ जागा निर्माण झाली आहे. हे धरण इंग्रजांच्या काळात 1913 साली पूर्णरूपास आले आहे. या जागी 460 प्रकारच्या वृक्षवेली, 30 प्रकारचे मत्स्य, 260 प्रकारचे पक्षी व 80 प्रकारच्या प्राण्यांचे दर्शन वर्षभरात दिसून येते. याच्या समृद्ध जैवविविधतेमुळे डॉ. सलीम अली यांनी नांदूरमधमेश्वर धरणास 1985 साली भेट दिली होती. मी स्वतः 2008 सालापासून नित्यनियमाने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात निरीक्षणे व छायाचित्रे, तपशिले गोळा करत आलो आहे. त्याप्रमाणे 2 Field guide पुस्तके व एक 22 मिनिटांची डॉक्युमेंटरी बनवली आहे. (पुस्तके ऍमेझोनला उपलब्ध आहेत). 2012 सालापासून वन विभाग, नाशिक व स्थानिक लोकांच्या महप्रयासाने आज या जागेचे रामसर यादीत निर्देशन झाले. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, स्थानिक लोकांचे, वन विभाग, नाशिकचे हार्दिक अभिनंदन!

2008 साली महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन नांदूरमधमेश्वर अरण्याच्या काठावर असलेल्या मांजरगाव येथे भरले होते. त्यानंतर मी स्वतः नांदूरमधमेश्वर अभयारण्य यावर माझे लक्ष केंद्रित केले. ‘रामसर-ठराव’ यासंबंधी माहिती गोळा केली व त्यादृष्टीने आजूबाजूच्या स्थानिक, तरुण व उत्साही मुलांची निवड करून परीक्षणांना सुरुवात केली. दरवर्षी सर्व सीझनमधील पक्षी आढळ यांचा रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली. लोकांचे ज्ञान वाढते म्हणून आम्ही आजूबाजूच्या खेडेगावातील शाळांमधून लेक्चर्स द्यायला सुरुवात केली. यामध्ये चापडगाव, मांजरगाव व करंजगावमधील तरुणांनी खूप उत्साह दाखविला.

उन्हाळय़ात चित्र जास्त विदारक होते. मेंढपाळ चाऱयासाठी तसेच पाण्यासाठी मेंढय़ाचे कळप अभयारण्यात घुसवत असत. काही लोक सरपणासाठी वृक्षतोड करीत असत. पाणथळ जागेतील माती, विटभट्टीसाठी वापरली जायची. वाळू उपसा हा तर नेहमीचा प्रॉब्लेम होता. पावसाळ्यात येथे जांभळी पाणकोंबडी हा पक्षी टायफा या वनसंपत्तीच्या कुरणात अंडी घालतो. एक एक घरटय़ामध्ये 10 ते 20 अंडी असतात. नेमके या वेळेसच आदिवासी जमातीतील लोक मशाल लावून पाण्यात उतरून ही अंडी पळवायचे. एका वर्षी हजारोंच्या संख्यने त्यांनी अंडी उचलून नेली. त्यानंतर चापडगावच्या काही तरुणांनी मोठ्या हिकमतीने अंड्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार केला. त्यामुळे परत आता जांभळी पाणकोंबडी हजारोंच्या संख्येने येथे दिसावयास लागली.

पूर्वी वनविभाग अधिकारी, सेवक, वनपाल या लोकांचे फक्त राऊंड व्हायचे आणि स्थानिक तरुणांचे व वनविभागाचे फारसे पटत नव्हते. त्यानंतर सततच्या प्रयत्नांनी मी व माझे सहकारी यांनी वनविभाग व स्थानिक लोकांचे संगनमत घडवून आणले. वनविभाग येथे गॅलरी पक्षीनिरीक्षण मनोरे उभारले. खानगांव थंडीला पक्षी निर्वचन केंद्र उभारले. राहण्याची सोय केली व मुख्य म्हणजे 24 तासांसाठी एक शिपाई नेमला. त्यामुळे भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांना आळा बसला.

2013 साली नांदूरमधमेश्वर धरणास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आम्ही एक छायाचित्रांचे पुस्तकवजा गाईड आपले ‘नांदूरमधमेश्वर-एक समृद्ध जैवविविधता’ असे पुस्तकाचे नाव ठेवले. याचा फायदा दरवर्षी येणाऱया पर्यटकांना झाला व त्यांना एक सूची मिळाली. 2016 साली अभयारण्यास संमत्ती मिळून 30 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वनविभागाने एक परिषद व व्याख्याने आयोजित केली होती. यावेळेस 22 मिनिटांची एक चित्रफीत ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक यांच्या वतीने प्रसारित करण्यात आली. 2018 जानेवारी महिन्यात नांदूरमधमेश्वर येथे ‘स्थानिक पक्षीमित्र संमेलन’ प्रथमच आयोजित केले गेले. वनजीव विभागाने अतिशय देखणा व योग्य असा 3 दिवसांचा कार्यक्रम केला. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांचा खूप मोलाचा वाटा व निर्देश होता. याच काळात हिंदुस्थानातील सर्वप्रथम कार्यान्वयीत केलेल्या डिजिटल कॅमेऱयाचे उद्घाटन वन्यजीव विभागाने CCF यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे 2 कॅमेरे (वायरलेस) पाणथळ भागात लावण्यात आले व त्याचे प्रसारण 50 इंची Sreenath live telecast करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पक्षी पर्यटकांना विना दुर्बिणीचे पक्षी जवळून बघण्यास मिळाले. दरम्यानच्या काळात वन्यजीव विभागाने रामसर यादीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू केले. आढावा बैठका घेण्यात आल्या व पक्षी निरीक्षणासाठीच्या विविध सुधारणा करण्यात आल्या. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक पुणे, मुंबई व इतर राज्यांतून येऊ लागले व त्यामुळे एक चांगला Data तयार होऊ लागला. आजमितीस 269 प्रकारच्या पक्षी वैविध्याची येथे नोंद झाली आहे व दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.

आज या जागेचे रामसर यादीत नाव समाविष्ट होणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. किंबहुना नांदूरमधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित होणे ही खूप आनंदाची बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना, शासनाला पर्यावरणाच्या बाबतीत एक पुढचे पाऊल म्हणून याचा वापर होईल हे निश्चित.

रामसर ठराव
अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातल्या तीन पाणथळ जागांचे अनुमोदन (रेकमेंडेशन) रामसर जागांसाठी पाठविले आहे. या तीन पाणथळ जागा की ज्या संरक्षित होतील व एक समृद्ध पाणथळ जागा म्हणून विकसित होतील. यामध्ये नांदुरमधमेश्वर प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प व लोणार सरोवर प्रकल्प यांचा समावेश आहे. ‘रामसर ठराव’ हा 2 फेब्रुवारी 1971 साली इराण येथील ‘रामसर’ या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संमत झाला.

‘रामसर ठराव’ हा जगातील विविध, जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे रक्षण करणे व त्यांच्या उगम स्रोतांचे संरक्षण करणे या हेतूने बनवला गेला. ‘रामसर’ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था असून त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंड या देशात आहे. रामसर ठरावाचे ध्येय म्हणजे जगातील जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे संरक्षण व पर्यावरणाचा ऱहास न होता केलेला हुशारीने वापर (वाइज युज), स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील कार्याने व आंतरराष्ट्रीय सहकार्याने घडवून आणणे व त्याचा सार्थ सहभाग हा निसर्गाच्या व मानवाच्या निरंतर विकासासाठी होणे हे आहे.

जागतिक पर्यावरणात समतोल राखण्यासाठी व ‘ग्लोबल वॉर्मिंग’ या संकटापासून दूर राहण्यासाठी ज्या नैसर्गिक व अनैसर्गिक पाणथळ जागा आहेत त्यांचे संरक्षण करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मानवाच्या अतिवापराने किंवा दुर्लक्षित भावनेमुळे पाणथळ जागांचे अतोनात नुकसान होते व तेथील जैवविविधता धोक्यात येते. या गोष्टींना आळा बसावा व लोकांमध्ये जैवविविधता टिकवण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशानेच ‘रामसर ठराव’ केला.

पाणथळ जागेत जमीन व पाणी यांचा वापर असल्याने जैवविविधता जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते व टिकू शकते. जैवविविधता हा निसर्गाचा आधार आहे. जैवविविधता टिकली तरच निसर्ग टिकू शकेल व निसर्ग टिकला तरच मानवाचे अस्तित्वही टिकू शकेल. नेमके हेच सत्य मानव विसरत चालला आहे. स्वतःच्या अन्य गरजांसाठी मानवाने चालवलेली निसर्ग नासाडी थांबवली पाहिजे. पाणथळ जागांचे सर्वात जास्त प्रमाणात शोषण होते. म्हणूनच संघटित प्रयत्नांनी पाणथळ जागांचे संरक्षण करणे ही महत्त्वाची बाब ठरते. ऑगस्ट 2013 पर्यंत जगात 168 देशांनी ‘रामसर’चे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. त्यामध्ये 2,160 पाणथळ जागांची यादी ‘रामसर यादी’मध्ये समाविष्ट केली गेली आहे. जवळजवळ साडेवीस कोटी हेक्टर क्षेत्र या पाणथळ जागांनी व्यापले गेले आहे.

जगभरातील विविध जैवविविधतेने समृद्ध पाणथळ जागांचे मानांकन करण्याचे कार्य ‘रामसर’ ही संस्था करीत असते. रामसर हे शहर इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण टोकाकडील किनाऱयावर वसलेले आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी तेथे एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. त्यामध्ये जागतिक पातळीवर एक ठराव संमत केला गेला. त्यानुसार जगातील विविध जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे संरक्षण करणे, त्यांच्या उगमस्थानांचे रक्षण करणे हा महत्त्वाचा हेतू आहे. ‘रामसर’ संस्थेचे प्रमुख कार्यालय स्वित्झर्लंड येथे आहे व जाने. 2020 पर्यंत यासाठी 170 देशांनी करारावर सहय़ा केल्या आहेत. जवळ जवळ 2 हजार 300 पेक्षा अधिक पाणथळ जागांचे संरक्षण आतापर्यंत झाले आहे. हिंदुस्थानात त्यापैकी 27 पाणथळ जागा असून नांदूरमधमेश्वर ही 28 वी व महाराष्ट्रातील पहिली पाणथळ रामसर ‘साईट’ आहे.

(लेखक पक्षीतज्ञ असून नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे)

[email protected]