रामविलास पासवान पंचत्वात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पार्थिव शनिवारी पंचत्वात विलीन झाले. पाटणा येथील दिघा घाट येथे जनार्दन घाटावर राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

74 वर्षीय रामविलास पासवान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी पाटणा येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. दिघा घाटावर त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि गिरीराज सिंह आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामविलास पासवान यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याप्रसंगी पासवान यांच्या पत्नी रिना, भाऊ पशुपती पारस आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.