
सामना ऑनलाईन, नागपूर
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील चुरशीच्या किताबी लढतीत विदर्भाने पहिल्या डावात 5 धावांची निर्णायक आघाडी मिळविण्यात यश मिळवले. विदर्भाच्या पहिल्या डावातील 312 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राचा डाव 117 षटकांत 307 धावांवर संपुष्टात आला. सलामीचा फलंदाज स्नेल पटेलची (102) शतकी खेळी आणि तळाला कर्णधार जयदेव उनाडकट (46) व चेतन सकारिया (नाबाद 28) यांनी शर्थीची झुंज दिली, पण त्यांना सौराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात अपयश आले. त्यामुळे आता हा सामना अनिर्णीत सुटला तरी विदर्भाला सलग दुसऱ्यांदा रणजी चषक उंचावण्याची संधी असेल.
पहिल्या डावात 5 धावांची आघाडी घेणाऱ्या विदर्भाने तिसऱ्या दिवशी उर्वरित 31 षटकांच्या खेळात 2 बाद 55 धावसंख्येपर्यंत मजल मारली. सौराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जाडेजाने कर्णधार फैझ फझल (10) व संजय रघुनाथ (16) ही विदर्भाची सलामीची जोडी 45 धावांत तंबूत पाठवून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर गणेश सतीश (खेळत आहे 24) व वसीम जाफर (खेळत आहे 5) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. आता बुधवारी सौराष्ट्राची मदार आपल्या गोलंदाजांवर असेल.
विदर्भाने घेतली सौराष्ट्राची फिरकी
सौराष्ट्राने दुसऱ्या दिवसाच्या 5 बाद 158 धावसंख्येवरून मंगळवारी पहिल्या डावात पुढे खेळायला सुरुवात केली. 87 धावांवर नाबाद परतलेल्या स्नेल पटेलने आज आपले शतक पूर्ण केले. त्याने 209 चेंडूंच्या संयमी खेळीत 15 चौकार लगावले, मात्र मंगळवारी 16 धावांवर नाबाद परतलेला प्रेरक मंडक 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर उनाडकट व सकारिया या अखेरच्या जोडीने 60 धावांची भागीदारी करून विदर्भाच्या तोंडचे पाणी पळविले होते. मात्र अक्षय वाखरेने उनाडकटला बाद करुन सौराष्ट्राचा डाव संपवला अन् विदर्भाला निसटती आघाडी घेण्यात यश मिळाले. आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे या फिरकीच्या जोडगोळीने अनुक्रमे 5 व 4 फलंदाज बाद केल्याने विदर्भाला पहिल्या डावात आघाडी घेता आली.






























































