चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मुस्लीम तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडमध्ये चोरीच्या संशयावरून शनिवारी एका मुस्लीम तरुणास जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाला असून तबरेज अन्सारी (24) असे या तरुणाचे नाव आहे. तबरेजला जमावाने तब्बल 18 तास बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. सोमवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

तबरेजला मारहाण करातनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एकजण तबरेजला बांबूने बेदम मारत असल्याचे दिसत आहे. 18 तास तबरेजला बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. येथील खरसवा गावात चोरी करण्याच्या संशयावरून तबरेजला जमावाने घेरत मारहाण केली होती. शनिवारी त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. झारखंडचा असणारा तबरेज पुण्यात एक दुकानात वेल्डिंगचे काम करायचा. ईद साजरी करण्यासाठी तो खरसवा या आपल्या गावी आला होता. याचवेळी घरातल्यांनी त्याचे लग्नही ठरवले. 18 जूनला रात्री तो दोन व्यक्तिबरोबर जमशेदपूरला जाण्यासाठी निघाला होता. मात्र ते त्याला कुठे नेत आहेत याबद्दल तबरेजला माहीत नव्हते. असे तबरेजच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

चोरीच्या संशयावरून जमावाने तबरेजला पकडताच त्याच्याबरोबरचे दोघाजणांनी तिथून पळ काढला. आपण चोरी केली नसल्याचे व सोबत आलेल्या तरुणांनी चोरी केल्याचे तबरेज जमावाला वारंवार सांगत होता. मात्र, जमाव काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. ते बांबू व लाठ्या काठ्यांनी त्याच्यावर तुटून पडले होते. याप्रकरणी अन्य दोघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.