रंगनाथ पठारे यांना विंदा जीवनगौरव, मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक, समीक्षक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासह श्री. पु. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक अशा चार पुरस्कारांची घोषणा केली. या वर्षीचा श्री. पु. भागवत पुरस्कार नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

साहित्य क्षेत्रात दमदार कथा, कादंबरी आणि परखड समीक्षक म्हणून प्रा. रंगनाथ पठारे ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे. 1999 मध्ये त्यांच्या ‘ताम्रपट’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सुधीर रसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 35 वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली 60 वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करीत आहेत. संजय भगत यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने तयार केलेला परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत पहिल्यांदा संगणकाच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य केले.

पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिनी, 27 फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़मंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात होणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.