रणजी क्रिकेट, पहिला दिवस मुंबईचा;अजिंक्य, पृथ्वी यांची दमदार अर्धशतके

549

रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील सोमवार पासून सुरू झालेल्या लढतीत बलाढय़ मुंबईने पहिला दिवस गाजवला. टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, युवा स्टार पृथ्वी शॉ, शम्स मुलानी व अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने सोमवारी पहिल्या डावात 8 बाद 362 धावा तडकावल्या, मात्र कोणालाही मोठी खेळी करता आली नसल्यामुळे पहिल्या डावात आणखीन मोठी झेप घेता आली नाही.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जय बिस्ता व पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी 74 धावांची आश्वासक सलामी दिली, पण अभिमन्यू राजपूतने जय बिस्ताला 18 धावांवर बाद करून जोडी फोडली. पृथी शॉने धडाकेबाज फलंदाजी करीत अवघ्या 62 चेंडूंत एक षटकार व 11 चौकारांसह 66 धावांची खेळी साकारली. अभिमन्यू राजपूतनेच त्याला बाद करून मोठा अडसर दूर केला. अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेने मधल्या फळीत मुंबईसाठी किल्ला लढवला. त्याने 145 चेंडूंत 10 चौकारांसह 79 धावा तडकावल्या. युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

108 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
कर्णधार सूर्यकुमार यादव (0), आदित्य तरे (12 धावा), आकाश पारकर (15 धावा) यांना अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर शम्स मुलानी व शार्दुल ठाकूर यांनी आठव्या विकेटसाठी 108 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरला. शम्स मुलानीने दोन षटकार व सात चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. शार्दुल ठाकूर 64 धावांवर बाद झाला. बडोदेकडून भार्गव भट्टने तीन, तर युसूफ पठाण व अभिमन्यू राजपूत यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

साप मैदानात आला अन् खेळ थांबला
रणजी ट्रॉफीचा सामना सुरू असताना मध्येच मैदानात साप आपल्याने खेळ थांबवावा लागल्याची घटना सोमवारी घडली. विजयवाडा येथे विदर्भ आणि आंध्र प्रदेशदरम्यान हा रणजी सामना सुरू होता. मैदानात साप आल्याने सामना उशिरा सुरू करावा लागला. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मैदानात साप सरपटत असल्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मैदानात शिरलेल्या या सापाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. मैदानात साप सरपटत असल्याने सर्व खेळाडूचे लक्ष सापाकडेच लागले.

आपली प्रतिक्रिया द्या