Ranji Trophy यशस्वी जयस्वालचे टीम इंडियाच्या दारावर टकटक, सलग तिसऱ्या डावात ठोकले शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल रणजी स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करतोय. 20 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने बंगळुरुमध्ये सुरू असलेल्या सेमीफायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध शतकी खेळी केली. यशस्वीने सलग तिसऱ्या डावामध्ये शतक ठोकले आहे. तत्पूर्वी त्याने क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडविरुद्ध दुसऱ्या डावात शतक (103 धावा) ठोकले होते आणि उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावातही शतकी खेळी (100 धावा) साकारली होती. आपल्या चमकदार कामगिरीमुळे त्याने टीम इंडियाचे दरवाजावर टकटक केली आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये यंदा यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत फक्त दोनच लढती खेळल्या आहेत. यात त्याने तीन शतक ठोकली आहेत. आजही उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने शतकी खेळी केली. सेमीफायनलमध्ये चौथ्या दिवसी दुसऱ्या डावात खेळताना यशस्वीने 240 चेंडूत शतक साजरे केले. विशेष म्हणजे या डावात खाते उघडण्यासाठी त्याने तब्बल 54 चेंडू घेतले होते.

अरमान जाफरचेही शतक

यशस्वी जयस्वाल याच्यासह अरमान जाफर यानेही शतक ठोकले. 259 चेंडूत 127 धावा काढून तो बाद झाला. 15 चौकार आणि एका षटकारासह त्याने ही खेळी सजवली. यशस्वीसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची भागिदारी केली.

ENGvsNZ एकाच टीममध्ये झाली जुळ्या भावांची निवड, प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाल्यास इतिहास घडेल

मुंबई सुस्थितीत

दरम्यान, पहिल्या डावात 213 धावांची आघाडी घेणारा मुंबईचा संघ सुस्थितीमध्ये पोहोचला आहे. बातमी लिहीपर्यंत मुंबईने आपली आघाडी 574 धावांपर्यंत पोहोचवली होती. मुंबईने 2 बाद 361 धावा केल्या असून यशस्वी 148 धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी कर्णधार पृथ्वी शॉ याने 71 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 64 धावांची तुफानी खेळी केली.