42 व्या जेतेपदासाठी मुंबई सज्ज

गेली सात वर्षे मुंबई रणजी जेतेपदापासून दूर आहे आणि तीच मालिका खंडित करत 42 वे जेतेपदाचे एकमेव लक्ष्य डोळय़ासमोर ठेवून मुंबईचे खडूस खेळाडू बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. आजपासून सुरू होणाऱया रणजी करंडकाच्या बाद फेरीत खेळणारे आठही संघ रणजीचे विजेते ठरले आहेत.

गेल्या मोसमात साखळीतच बाद झालेल्या मुंबईने यंदा चार सामने डावाने जिंकत गुणतालिकेत सर्वाधिक गुण मिळवले होते. वांद्रे-कुर्ला संकुलात एमसीए अॅकॅडमीत होणाऱया सामन्यात मुंबईचे पारडे जड असले तरी शिवम दुबे, श्रेयस अय्यरविना खेळणाऱया मुंबईला हा सामनाही डावानेच जिंकायचा आहे. मुंबईचा संघ दुसऱयांदा सात वर्षे रणजी जेतेपदापासून दूर आहे. सर्वप्रथम 1985-86 सालानंतर तब्बल आठ वर्षे विजेते होता आले नव्हते. आताही गेले सात वर्षे मुंबई 42 व्या जेतेपदाला जिंकू शकलेला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई ही मालिका खंडित करण्यासाठी खेळणार आहे.

मुंबई-बडोद्याव्यतिरिक्त विदर्भ-कर्नाटक (नागपूर), मध्य प्रदेश- आंध्र प्रदेश (इंदूर), आणि सौराष्ट्र-तामीळनाडू (कोइंबतूर) अशा उपांत्यपूर्व लढती खेळल्या जाणार आहेत.