हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा; रणजीत सावरकरांचा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास

3588

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होऊन महिना उलटत आला तरी सरकार स्थापन झालेले नाही. कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या घडामोडींमध्ये शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वीर सावरकरांना भारतरत्न देणे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर काही जण मुद्दाम प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मात्र उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पूर्ण विश्वास दाखवत अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे. शिवसेनेचा आत्माच हिंदुत्त्व हा आहे, असे रणजीत सावरकर म्हणाले. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ओळखतो. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाताना हिंदुत्वाची भूमिका कधीही सोडणार नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे या दोन पक्षांसोबत जाताना मूळ विचारधारेला धक्का लागणार नाही हे स्पष्ट आहे. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत चर्चा सुरू असली तरी आपली हिंदुत्वाची भूमिका न सोडता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हिंदुत्वाबाबतच्या दृष्टीकोनात उद्धव ठाकरे नक्कीच बदल घडवतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशहिताच्या कार्याची जाणीव ठेवत शिवसेनेने त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी लावून धरल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या