धार्मिक मिरवणुकीत शस्त्रं कशासाठी नेली? भाजप खासदाराचा हिंदुत्ववादी संघटनांना घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणा येथील नूंह येथे ब्रजमंडल यात्रेच्या मिरवणुकी दरम्यान उफाळलेल्या जातीय संघर्षानंतर राज्य सरकारच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेल्या या मिरवणुकीवेळी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय तुटपुंजा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे आरोप प्रशासनावर केले जात आहेत. दरम्यान, एका भाजप खासदारानेच हिंदुत्ववादी संघटनांना घरचा आहेर दिला आहे.

नूंह येथील मिरवणूक जर धार्मिक होती, तर त्यात शस्त्र कशासाठी नेली? असं जर एखाद्या धार्मिक कार्यक्रमात होत असेल तर ते योग्य नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार राव इंद्रजीत सिंह यांनी हिंदुत्ववादी संघटनांवर केली आहे. राव हे केंद्रीय सांख्यिकी राज्य मंत्री असून ते गुरुग्रामचे खासदार आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राव इंद्रजीत सिंह यांनी हिंदुत्ववादी संघटनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते म्हणाले की, या मिरवणुकीत जाताना त्यांच्याकडे हत्यारं कुणी दिली होती, कोण मिरवणुकीत हत्यारं घेऊन जातं, लाठ्या-काठ्या घेऊन जातं? तलवारी कोण घेऊन जातं? हे चुकीचं आहे. मी हे म्हणत नाही की दुसरीकडून काही हिंसा घडली नाही किंवा त्यासाठी उद्युक्त करण्यात आलं नाही. पण, हिंदुंकडूनही हिंसाचाराला सुरुवात झाली, असं सिंह यावेळी म्हणाले.