बलात्काराचा आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार

734

श्रीरामपूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांसमोर बेड्यांसह रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून गेला. राहुल गणेश शिंदे (वय 20, रा. लाडगाव. ता. वैजापुर) असे फरार आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्याला रुग्णालयात आणले होते.

आरोपीच्या तपासणीसाठी पोलीस शिपाई प्रवीण क्षिरसागर, पोलिस शिपाई मनोज हिवाळे यांनी राहुल शिंदे याला रुग्णालयात आणले होते. त्याचे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यास लघवीचा नमुना देण्यासाठी त्याला शौचालयात पाठविले होते. शौचालयातून तो बाहेर आला आणि पोलिसांसमोरच भिंतीवरून उडी मारून पळून गेला. राहुलच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके परिसरात पाठविली आहेत.

राहुल याच्यावर खिलारी वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असा गुन्हा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्यामुळे शिंदे हा पोलीस कोठडीत होता. त्याची मुदत मंगळवारी संपणार होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. पण, त्यापूर्वी तो रुग्णालयातून पळाला, असे तपास अधिकारी संभाजी पाटील यांनी सांगितले आहे.

आरोपी लवकर सापडेल
बलात्काराच्या गुन्ह्यातील राहुल शिंदे याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिस पथके पाठविली आहेत. लवकरच तो पोलिसांना सापडेल.
– राहुल मदने, पोलीस उपअधीक्षक

आपली प्रतिक्रिया द्या