बलात्काराच्या हेतूने अल्पवयीन मुलीवर दारू ओतली; धाक दाखवण्यासाठी केला चाकूहल्ला

उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या आणि गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या हेतूने परिसरातील गावगुंडांनी मुलीवर काही दिवसांपूर्वी दारू ओतली होती. मात्र, मुलीने तेथून पळ काढला. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी फक्त तक्रार दाखल करून घेतली होती. मात्र, कोणालाही अटक केली नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे गावगुंडाची मुजोरी वाढली आहे. गावगुंडांनी शनिवारी अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तिच्यावर चाकूहल्ला केला आहे.

आजीला चहा देण्यासाठी शनिवारी संध्याकाळी आपण दुकानात गेलो होतो. त्यावेळी परतत असताना गावगुडांनी आपल्याला घेरले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने त्यांना ओळखता आले नाही. त्यातील एकाने चाकू काढून आपल्याला धमकावले. बचावासाठी आपण हात पुढे केला. त्यात आपल्या हाताला चाकू लागल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. हातातून रक्त वाहत असल्याने आजीने आरडाओरडा केल्यावर गावगुंडांनी पळ काढल्याचे मुलीने सांगितले. या हल्ल्यात मुलीच्या हाताला जखम झाली आहे. याआधीही गावगुंडांनी बलात्कार करण्याच्या हेतूने मुलीवर दारु ओतली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी फक्त तक्रार दाखल करून घेतली होती. या प्रकरणी कारवाई झाली नसल्याने गावगुंडांची मुजोरी वाढल्याचे दिसत आहे.

आपण मुलीला घेऊन तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे मुलीच्या आजीने सांगितले. उलट महिला हवालदार मुलीला धमकावत होत्या, असा आरोप मुलीच्या आजीने केला आहे. पोलीस आरोपींवर कोणतीही कारवाई करत नसल्याने मुलीच्या जीवाला धोका असल्याने आजीने म्हटले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पास्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप होत आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या