
सामना ऑनलाईन । नालासोपारा
तुझ्या वडिलांनी बोलावले आहे, असे सांगून अल्पवयीन मुलींवर बळजबरी करणारा सीरियल रेपिस्ट नालासोपाऱ्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार दिवसांत दोन मुलींवर त्याने अत्याचार केला असून पोलिसांनीच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून एक विकृत तरुण अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. ‘तुझ्या वडिलांनी बोलावले आहे’, ‘तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे’ अशा सबबी सांगून निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करायचा. नालासोपाऱयातही चार दिवसांत दोन मुलींना त्याने आपले भक्ष्य केले आहे. मंगळवारी त्याने नालासोपारा पूर्वच्या संखेश्वरनगरमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने गुरुवारी एव्हरशाईननगर येथे अशाच पद्धतीने मुलीला फूस लावून अत्याचार केले.
शाळांमध्ये बैठका, 25 हजारांचे इनाम
पीडित मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्र बनविण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते त्यातही हाच विकृत असल्याचे या पीडित मुलींनी ओळखले आहे. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली आहेत. पालकांना आणि मुलांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे नालासोपारा शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन शिक्षकांच्या बैठका घेऊन माहिती दिली. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱयास 25 हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
























































