
अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खानने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत तब्बल 11 विकेट घेत आयसीसी वन डे गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं आहे. त्याने 6.09 च्या सरासरीने आणि 2.73 च्या इकॉनॉमी रेटने अफलातून गोलंदाजी करत एकदा ‘फाइव्ह विकेट हॉल’ नोंदवला. या कामगिरीमुळे त्याने दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज, श्रीलंकेचा महेश तिक्षाना, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, हिंदुस्थानचा कुलदीप यादव आणि नामिबियाचा बर्नार्ड स्कॉल्ट्ज यांना मागे टाकले. अजमतुल्लाह ओमरजईने 7 बळी घेत आयसीसी ऑलराऊंडर क्रमवारीत पहिले स्थान मिळवलं, तर इब्राहिम जद्रान सलग दोन सामन्यांत 95 धावा करून फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. जद्रानला मालिकेचा ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ घोषित करण्यात आलं. दरम्यान, हिंदुस्थानचा कुलदीप यादव कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सात स्थानांची झेप घेत 14 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. राशिदच्या या शानदार पुनरागमनानं पुन्हा सिद्ध केलं की, फिरकीची जादू अजूनही अफगाणिस्तानच्या मनगटात जिवंत आहे.