Astrology । Horoscope । 29 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – बुधवारी मृग नक्षत्र 1.58 पर्यंत आहे, त्यानंतर आद्रा नक्षत्र आहे. तसेच साध्य योग आहे. कार्तिक कृष्ण द्वितीया आहे. पंचागानुसार आजचा शुभ दिवस आहे. आज वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, कुंभ आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 12.00 ते 1.30 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात होत असल्याने मानसन्मानाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सहकाऱ्यांशी आणि जोडीदाराशी मतभेद टाळावे, अन्यथा नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार आहे. पैशांची आवक समाधानकारक असल्याने व्यवहारांना गती मिळेल. हातात पैसे असल्याने मनातील एखादी इच्छा पूर्ण कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर येतील. तज्ज्ञांच्या सल्लानेच योग्य निर्णय घेतल्यास फायदा होणार आहे.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानात होत असल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. अचानक लाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रातील वातावरण उत्साहाचे असेल. घरातील वातावरणही आनंदाचे असेल. मात्र कोणत्याही कामात घाईगडबड टाळा. वेळेचे महत्त्व लक्षात घेत योग्य नियोजन करा म्हणजे कामाचा ताण कमी होईल. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना अंमलात आणता येतील. घरातही खेळीमेळीचे वातावरण असेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होणार असल्याने आर्थिक समस्यांतून मार्ग निघणार आहे. कार्यक्षेत्रात सहकार्याचे वातावरण असेल. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवल्यास कामे सहज शक्य होतील. आज उत्साह जाणवत असल्याने दिवस मनाजोगा जाईल. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे प्रसन्नता जाणवेल. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. घरातील वातावरण समाधानकारक असेल.

कर्क
कर्क राशीला आज सावध राहण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होत असल्याने अचानक खर्च उभे ठाकतील. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापार, व्यवसायात कोणतेही व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक चंचलता जाणवणार आहे. भावनांना आवर घालावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात कामाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कामात कोणत्याही त्रुटी ठेऊ नका किंवा कामे पुढे ढकलू नका, अन्यथा नंतर कामांचा बोजा वाढणार आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात होत असल्याने अचानक लाभाचे योग आहे. आजचा दिवस फायद्याचा असला तरी व्यापारात आणि कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. उत्पन्नात वाढ होण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. व्यावसायिकांसाठीही आजचादिवस अनेक संधी आणणार आहे. कार्यक्षेत्रात सहकार्याचे वातावरण असेल. घरातील वातावरणही समाधानकराक असेल. अनेक सकारात्मक बदल घडून येतील. मनावरील एखादे दडपण कमी होईल. एखादी समस्या बराच काळापासून असल्यास त्यातून योग्य मार्ग सापडतील.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होणार असल्याने कामांचा व्याप वाढणार आहे. व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आज चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या सल्ल्याचा फायदा होणार आहे. कामाचा व्याप वाढला तरी उत्साही असल्याने कामे वेळेत पूर्ण कराल. कुटुंबियांसाठी वेळ काढल्यास घरात प्रसन्न वातावरण असेल. मात्र, गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहावे. इतरांवर विसंबल्यास अनेक कामे रखडू शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामात स्वतः लक्ष घालून ते पूर्ण करावे.

तूळ
तूळ राशीला आज उत्तम दिवस आहे. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात होत असल्याने नशिबाची साथ मिळणार आहे. कामाचा व्याप वाढला तरी सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होणार आहेत.मात्र, विनाकारण दगदग, धावपळ टाळावी. घाईगडबडीत आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आज एखादा शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही आजचा दिवस चांगला जाईल. मुलांकडून किंवा कुटुंबियांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण सकारात्मक असेल.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढणार आहेत. घरातील गैरसमज आणि दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे. जोडीदाराच्या सहकार्याने घरातील वातावरण प्रसन्न असेल. आरोग्याच्या तक्रारी सोडल्यास दिवस समाधानात जाणार आहे.

धनू
धनू राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढला तरी कौशल्याने कामे वेळेत पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातही उत्साहाचे वातावरण असेल. व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. स्थैर्याची भावना वाढीस लागेल. भागीदारीत व्यवसाय असलेल्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. घरात आनंदी वातावरण असेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानात होत असल्याने कामांचा व्याप वाढणार आहे. तसेच विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळणार आहे. बोलण्यात गोडवा ठेवत कामे केल्यास कामे सहज पूर्ण होतील. आळस झटकून रखडलेल्या योजनांना गती द्यावी लागणार आहे. विनाकारण जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. घरातील वातावरण उत्साही असेल.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्र पंचम स्थानात भ्रमण करत असल्याने शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत. आजचा दिवस सुख-समृद्धीचा असला तरी कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरातील कामे वाढणार आहेत. घरासाठी काही खरेदी करण्याचे योग आहेत. मानसिक अस्थिरता दूर होईल. मेडिटेशन केल्यास मानसीक शांतता मिळणार आहे. क्षुल्लक गोष्टीमध्ये अडकू नका. घरातील वातावरण सकारात्मक असेल.

मीन
मीन राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानात होत असल्याने घरासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे. घरासाठी काही खरेदी करण्याचे योग आहेत. रखडलेल्या कामांना गती दिल्यास त्या पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, तरीही त्या तुम्ही पूर्ण कराल. जुना मित्र किंवा नातेवाईकांची भेट होण्याचे योग आहेत. अति विचारात किंवा नकारात्मक विचार टाळावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असल्यास त्याची सुरुवात करता येणार आहे. दिवस आनंदात जाणार आहे.