>> रश्मी वारंग
विविध संस्कृतींमध्ये नारळ अत्यंत लोकप्रिय आहे. नारळाला ‘श्रीफळ’ म्हटले जाते. प्रत्यक्ष देवी लक्ष्मीच्या हातामध्ये नारळ स्थानापन्न झालेला दिसतो. नारळी पौर्णिमेला महाराष्ट्रात नारळाचे महत्त्व अबाधित आहे. खाद्यसंस्कृतीसोबतच दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या ठरलेल्या या बहुगुणी फळाला समुद्रराजाला अर्पण करीत नारळी पौर्णिमा साजरी करू या.
हिंदुस्थानी संस्कृतीत एकाच वेळी पौष्टिकता, स्वाद, उपयोग आणि धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असणारं फळ कोणतं? असा प्रश्न विचारला असता फक्त आणि फक्त एकच उत्तर मिळतं आणि ते म्हणजे नारळ. या नारळाचं घनिष्ठ नातं नारळी पौर्णिमेशी आणि पर्यायाने नारळीभात, नारळाचे लाडू, नारळ बर्फी आणि अशाच अन्य पदार्थांशी जोडलेलं आहे. या नारळाची शब्दश ‘चव’दार गोष्ट जाणून घेऊया.
रामायण-महाभारत काळापासून नारळ या फळाचा उल्लेख झालेला दिसतो. वेदांमध्ये मात्र नारळाचा उल्लेख नाही. इंग्रजीमध्ये नारळासाठी ‘कोकोनट’ हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेत ‘कोको’ या शब्दाचा अर्थ होतो कवटी किंवा डोकं. नारळाचा माणसाच्या चेहऱ्यासदृश आकार आणि त्याला असलेले डोळे. त्यामुळे पोर्तुगीजांनी हे नाव या फळाला दिलं आणि त्याचेच पुढे कोकोनट झाले.
विविध संस्कृतींमध्ये नारळ अत्यंत लोकप्रिय आहे. नारळाला ‘श्रीफळ’ म्हटले जाते. प्रत्यक्ष देवी लक्ष्मीच्या हातामध्ये नारळ स्थानापन्न झालेला दिसतो. नारळी पौर्णिमेला महाराष्ट्रात नारळाचे महत्त्व जसं अबाधित आहे तसंच दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेला लोख्खी अर्थात लक्ष्मीपूजेत बंगाली समाजातील लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. त्याशिवाय विविध पूजांमध्ये नारळाचा वापर अनिवार्य ठरतो. स्त्राrची नारळाने ओटी भरणे तिच्या प्रजननाशी जोडलं गेलं आहे. कोणत्याही कार्यातील विघ्न दूर करण्यासाठी नारळ फोडणं हे प्रतीकात्मक आहे. नारळाची करवंटी कडक, तर आतला गर मऊसूत असतो. वरचं अहंकाराचं आवरण फोडल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही, असाही अर्थ निघतो आणि नारळाचं रूप मानवसदृश असल्याने नरबळी प्रथेशीही ती कृती जोडली जाते. या सगळ्या प्रथांच्या पलीकडे नारळाचं चवीशी, वेगवेगळ्या पदार्थांशी जोडलं गेलेलं नातं अनन्यसाधारण आहे.
महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये नारळीभात, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी, नारळाच्या वडय़ा, सोलकढी, नारळाची चटणी, नारळाचा चव वापरून केलेले पदार्थ लोकप्रिय आहेत. दक्षिण हिंदुस्थानात नारळाचा मुबलक वापर होतो. प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीला नारळाचे लाडू बांधून देण्याचा प्रघात आहे. ते शुभशकुनाचे मानले जाते. त्याशिवाय जगभरात नारळाच्या पाककृती चवीने खाल्ल्या जातात.
आंबा आणि नारळ यांचे पॅनकोटा प्रसिद्ध आहे. नारळापासून बनणारी ‘कोंबू बर्थाड‘ म्हणजे गोव्यात बनणारी खास डिश. मशरूम आणि नारळाचा मुबलक वापर त्यात होतो. असाच नारळ वापरून केला जाणारा खास केरळीय पदार्थ म्हणजे पुट्टू. केरळ आणि तामीळनाडूत खोवलेला नारळ आणि भात यांचे थर एका बांबूच्या खोलगट नळीत बसवले जातात. अलीकडच्या काळात स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या नळ्यांचा वापर होतो. त्यानंतर ते वाफवले जातात. रवा पुट्टू, राईस पुट्टू, दाल पुट्टू या भागात प्रसिद्ध आहे.
खाद्यसंस्कृतीसोबतच दैनंदिन जीवनात महत्त्वाचा ठरलेला नारळ कल्पवृक्ष ठरतो. खोबरं, पाणी, करवंटी, झावळ्या… सगळ्यांचा पुरेपूर वापर होतो. अशा या बहुगुणी फळाने समुद्रराजा खुश झाला नाही तर नवलच. म्हणूनच ‘नारिकेलं समर्पयामि’ म्हणत नारळी पौर्णिमा साजरी करू या. नारळीभात, नारळ बर्फी खाऊन सणाचा आनंद द्विगुणित करू या.
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)