
गोर बंजारा विमुक्त जाती अ प्रवर्गातील आरक्षणातील खोटे (बोगस) राजपूत भामटांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी,राजपूत भामटा जातीतून भामटा शब्द हटविण्यात येऊ नये,अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जात अवैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी व लाभार्थ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी आमच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन करून हा प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने वेगळा मार्ग निवडू. येणाऱ्या निवडणुकीत राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. मूळ विमुक्त जाती प्रवर्ग (अ) मध्ये मागील अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या जातीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घुसखोरी केल्यामुळे मुळ लोकांवरती अन्याय होऊन शैक्षणिक व नोकरीत नुकसान झाले आहे. नोकर भरती, डॉक्टर व इंजिनिअरिंगसारख्या प्रवेश प्रक्रीयेमध्ये विद्यार्थी व नोकरदारांवर अन्याय होत आहे.राजपूत भामटा जातीच्या नावाचा गैरफायदा घेऊन अवैधरीत्या जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली.
नायब तहसीलदार मुरलीधर बागुल, मंडलाधिकारी राजेंद्र शेकटकर, तलाठी हरी सानप यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या सरकार दरबारी कळवल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
























































