
सामना ऑनलाईन, मुंबई
डोंगरीप्रमाणेच कामाठीपुऱ्यातील इमारतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. 100-150 वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक बिल्डिंगच्या भिंती उंदीर, घुशींनी पोखरल्या आहेत. लोखंडी पिलर्सची झीज झाल्यामुळे रहिवाशांनी लाकडी खांबांचा टेकू लावला आहे. साधारण 150 वर्षांपूर्वी बांधलेली चौदाव्या गल्लीतील भंडार बिल्डिंग कधीही कोसळू शकते या भीतीने येथील रहिवाशांची झोप उडाली आहे.
‘आमचं हातावर पोट हाय, मोलमजुरी करून जगतोय. त्यामुळे मरण दिसत असतानाही या जुन्या बिल्डिंगमध्येच राहतोय. दुसरीकडे भाडय़ाने राहण्यासाठी तरी पैसे कुठून आणायचे? आमच्या वाटय़ाला मरणयातना आहेत. आम्हाला मोठे घर नकोय, सुखाने झोप लागेल असा निवारा हवाय’ अशी प्रतिक्रिया भंडार बिल्डिंगमधील रहिवासी व्यक्त करतात. बिल्डिंगचा पुनर्विकास जागामालकाच्या वेगवेगळय़ा अटींमुळे रखडला होता. आता बिल्डिंग पडायला आल्यानंतर जागामालक पुनर्विकासाला तयार झालाय. पण काही अप्रिय घडण्याच्या आधी पुनर्विकास व्हावा अशी अपेक्षा माजी नगरसेवक सुरेश काळे यांनी व्यक्त केली. दोन माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये 23 भाडेकरू 10 बाय 10 च्या रूममध्ये राहतात. कामाठीपुऱ्यात खासगी बिल्डर यायला तयार होत नाहीत. त्यामुळे म्हाडानेच पुनर्विकासाला गती द्यावी आणि आमचे जीव वाचवावेत अशी कळकळीची विनंती रहिवासी करत आहेत. म्हाडाच्या धोरणात गोंधळ आहे म्हणून पुनर्विकास होत नाहीय, असे शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख सुनील कदम यांनी सांगितले. या बिल्डिंगशेजारीच असलेल्या गजुल, सोडावाला, देऊल आदी बहुतांश चाळींचीही दुर्दशा झाली आहे.
पावसाचे पाणी घरात साचते. पुरा संसार भिजतो. बिल्डिंगला तर वाळवी लागलीय. ठिकठिकाणी भेगा पडल्यात. दोन बिल्डिंगमधल्या हाऊस गल्ल्यांमध्ये गाळ आणि कचऱ्याचा ढीग साचलाय. त्याच्या दुर्गंधीचा सामना करतोय. परंतु आता मरणाची भीती वाटू लागलीय– नम्रता गांगण, रहिवासी
माझ्या घरचा स्लॅब काही दिवसांपूर्वीच पडला. रोज रात्री झोपेत असताना वरून स्लॅबची वाळू, छोटेमोठे दगड डोक्यात पडतात. घरात मी, बहीण व 60 वर्षांची आई असे तिघेजण राहतो. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. भाडय़ाने घर घेण्याची ऐपत नाही. त्यामुळे धोका पत्करूनच जीर्ण बिल्डिंगमध्ये राहतोय– प्रवीण आंग्रे, रहिवासी
पालिका प्रशासनाने डोंगरी, कामाठीपुरा, कुंभारवाडय़ातील किती इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले ते सांगावे. जर हे ऑडिट केले असते तर डोंगरीत इमारत दुर्घटना घडली नसती. पालिकेच्या बिल्डिंगव फॅक्टरी विभागातील अभियंत्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जागामालक, रहिवासी आणि दुकानदार या तीन घटकांना एकत्र घेऊन पुनर्विकास कायदा बनवला पाहिजे– पांडुरंग सकपाळ, शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख
मी लॉची स्टुडंट आहे. आम्ही 10 बाय 10च्या घरात पाचजण राहतो. घरातली इलेक्ट्रिक सिस्टम खराब झालीय. अधूनमधून शॉकही लागतो. वरून पाणी गळते व ते घरभर साचते. त्यात पुस्तकेही भिजतात. आम्ही शिक्षण घेतोय, पण उद्याची गॅरंटी नाहीय. सारखी दुर्घटनेची भीती वाटतेय– लेखा श्रीगर्ला, विद्यार्थिनी
घरातील लोखंड पूर्णपणे सडलेय. प्रत्येक पावसाळ्यात किचनमध्ये पाणी गळते. घरात लहान मुले आहेत. स्लॅबची वाळू सारखी खाली कोसळते. त्यामुळे स्लॅब किंवा बिल्डिंगच कोसळतेय की काय अशी भीती वाटते. म्हाडाने दुर्घटनेची वाट बघू नये. लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित घर द्यावे– महावीर जैन, रहिवासी
आवाहन
मुंबईत शेकडो, हजारो इमारती धोकादायक म्हणून सरकारदरबारी नोंदलेल्या आहेत, पण त्यापलीकडेही ही यादी असू शकते. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने अशा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये कितीतरी कुटुंबे डोक्यावर भीतीची टांगती तलवार घेऊनच राहत आहेत. खोली रिकामी केली तर ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये खितपत पडावे लागेल ही भीती असते आणि या भीतीपोटीच मृत्यूची भीती आपलीशी केली जाते. वाचकहो, तुमच्या अशा इमारतींची किंवा तुमच्या शेजारची इमारत अशी भीतीच्या टेकूवर उभी असेल तर आम्हाला माहिती द्या! ई-मेल- [email protected]


























































