ठसा – रतनलाल बाफना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जहाँ विश्वास ही परंपरा है हे ब्रीदवाक्य ज्यांनी लिहिलं, त्याला जपलं, आपल्या व्यवसायात त्याला पुजलं अशा जळगावला सुवर्णनगरी म्हणून नाकलौकिक मिळवून देणाऱ्या भाईसाहब रतनलालजी बाफना याचे नुकतेच आजाराने निधन झाले. बाफनाजींनी आपले अख्खे आयुष्य व्यवसाय सांभाळण्याबरोबर जीवदया, शाकाहार यांचा प्रसार करण्यात घालविले.

राजस्थान जन्मभूमी, परंतु कर्मभूमी त्यांनी जळगावला बनविले. शून्यातून विश्व निर्माण केले, दारी आलेल्या प्रत्येकाला शक्य तितकी मदत करणे, सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे हे त्यांचे नित्याचे काम होते. धर्म समजणे आणि धर्माचे पालन करणे यात फार मोठे अंतर आहे.

बाफनाजींनी उभे आयुष्य आपल्या धर्माचे पालन केले. स्वभावाने ते खूप उत्साही, प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. ते लहानात लहान व मोठय़ात मोठे म्हणून वावरत. शोकसभेस उपस्थित मान्यकरांनी त्यांना दातृत्वाचा महामेरू, पुण्यात्मा अशा विविध उपाधींनी स्मरण केले.

रतनलालजींचा जन्म 11 फेब्रुवारी 1935 रोजी राजस्थानमधील भोपालगढ येथे झाला. 18 सप्टेंबर 1954 रोजी त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाले आणि जळगावस्थित राजमल लखीचंद ज्केलर्स या सुवर्णपेढीत त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाल्याने त्यांनी येथेच 19 वर्षे आपली सेवा दिली.

व्यवसायातील कसब हस्तगत केल्यामुळे त्यांच्या आतमधील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, म्हणून 26 जानेवारी 1973 रोजी नोकरीचा राजीनामा देऊन 10 मार्च 1974 रोजी जळगाव येथेच स्वतःचे सोन्याचांदीचे पहिले शोरूम सुरू केले. त्या छोटय़ा वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तद्नंतर शुद्धता व प्रामाणिकता तत्पर व उत्तम सेवा, कलाकुसरीला वाव या सर्क बाबींना प्राधान्यक्रमाने अंगीकारून नाकलौकिक प्राप्त करत वर्ष 2005मध्ये संभाजीनगर, नाशिक व पुढे नांदेड, जळगावातील दुसरे शोरूम तसेच कोल्हापूर व पुणे येथे शोरूम सुरू करून कार्यविस्तार केला.

सामाजिक कार्यात शाकाहार प्रसार, झुणका-भाकर केंद्र, पाणपोई, नेत्रपेढी, गोरगरीबांना आर्थिक मदत, गोपालन तसेच आता त्यांनी दिव्यांगांसाठी एक शैक्षणिक चळवळ सुरू केली होती. रतनलाल बाफना यांना देशभरात अनेक पुरस्कारांनी सन्मानित व गौरविण्यात आले आहे. विशेषतः आचार्य हस्ती अहिंसा अवॉर्ड, पुणे येथे शाकाहारप्रिय पुरस्कार, दिल्ली येथे ऋषभश्री पुरस्कार, मुंबईकरांनी व्हेजिटेरिअन ऑफ दि इयर या पुरस्काराने केलेले गौरव, चेन्नई येथे भगवान महावीर अवॉर्डने सन्मानित, अत्यंत प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज पुरस्कार, जैन रत्न पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जोधपूर येथे सेवारत्न पुरस्कार, गुणरत्न पुरस्कार, मध्य प्रदेशमध्ये संघरत्न विभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

मला तर त्यांचा 30 वर्षांचा सहवास त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना लाभला. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, बाफनाजींच्या सहवासात मला राहायला मिळाले, शिकायला मिळाले, त्यांच्या जीवनातील सर्व पैलू पाहता आले. बाफनाजी आपल्या सख्ख्या साडूच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन सोडून माझ्या मुलीच्या म्हणजे त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नात उपस्थित होते. तसेच लग्नात बोलताना लग्नाच्या व्यवस्थापनात काहीही त्रुटी असल्यास त्यासाठी मनोहरला जबाबदार न धरता मला जबाबदार समजावे असे ते म्हणाले. त्यांच्या या एका वाक्याने त्यांचे माझ्याबद्दल, माझ्या परिवाराबद्दल असलेलं प्रेम त्यांनी प्रकट केलं. या महान व्याक्तीचा, समाजसेवकाचा नावलौकिक कायम राहील.

– मनोहर पाटील