
कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
टोपे यांनी सांगितले की, पारंपरिक आरटीपीसीआर चाचणीपेक्षा रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे निदान लवकर म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात मिळतो. यामुळे या चाचण्या विमानतळ, तातडीचा रेल्वे प्रवास किंवा इतर वैद्यकीय आपत्ती दरम्यान करण्यात येतो. मात्र, रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे शुल्क जास्त असते. आता तपासणीसाठी आवश्यक रिएजंटस, व्हिटीएम किट्स, पीपीई किट आणि अरेंज एक्स्ट्रैक्शन किट्स माफक दरात उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबी लक्षात घेत दर निश्चित करण्यासाठी नियुक्त समितीने अहवाल सादर केला. त्यानुसार राज्यातील कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळेत रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. Abbot ID/ Thermo fisher Accula या दोन्ही चाचणी पद्धतीसाठी हे दर असतील. मात्र टाटा Tata MD3 Gene Fast / Tata MDFX चाचणी पद्धतीसाठी 975 रुपये असतील. मात्र, रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी घरी जाऊन नमुने गोळा केल्यास प्रयोग शाळांना दोनशे रुपये अतिरिक्त दर आकारण्याची मुभा असेल.
सर्वसाधारण आरटीपीसीआर चाचणीसाठीचे दर 6 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत. ते दर पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असेही टोपे यांनी सांगितले. 6 डिसेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कोविड आरटीपीसीआर चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमुना घेत त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 350 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 500 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेत त्याचा अहवाल देणे यासाठी 700 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


























































