धान्य घोटाळ्याप्रकरणी बाहेती, खुराणा, पारसेवार आणि तापडीया यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

कृष्णूर येथील इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये अवैधरित्या रेशनचे धान्य नेल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ताशेरे झाडल्यानंतर आणि तपासाच्या दिशेबाबत असमाधान व्यक्त केल्यानंतर सीआयडीच्या अधीक्षक लता फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी साडेतीन वाजता अजयकुमार बाहेती, ललित खुराणा, राजू पारसेवार आणि जयप्रकाश तापडीया या आरोपींना अटक केली.

या प्रकरणी काही दिवसांपूर्वी न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे झोडले होते. तसेच हा तपास पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आला होता. आज लता फड यांच्या पथकाने या चार आरोपींना दुपारी साडेतीन वाजता अटक केली. पुढील कारवाई केली जाणार आहे. लता फड यांच्या पथकामध्ये पोलीस उपअधीक्षक आय.एन.पठाण, आर.के.गुजर, बी.एल. राठोड, पोलीस निरीक्षक बी.एन.आलेवाड, इंगळे, हेकॉ.जमील मिर्झा, आर.आर.सांगळे, आर.एन.स्वामी, एस.व्ही.राचेवार यांचा समावेश आहे.

या आरोपींना अटक झाल्यानंतर कंत्राटदारांमध्ये खळबळ माजली असून, त्यांना पाठिशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत अधिकाऱ्यांच्या तपास प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करुन हे अधिकारी चौकशी करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न करीत आहेत, असा संशय येतो, असेही मत न्यायालयाने नोंदविले आहे. या अधिकाऱ्यांवर दोष सिध्द झाल्यास त्यांना आरोपी करण्यात येईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली होती.

यासंदर्भात येत्या १८ मे रोजी सुनावणी होणार असून, त्या सुनावणीमध्ये या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचेही पोस्टमार्टम करण्यात येणार आहे, असे समजते.

या प्रकरणात आता काहीच होवू शकणार नाही, आरोपी सुटणार असेच बोलले जात होते. परंतू सीआयडी पथकाने केलेल्या अटकेमुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा पटरीवर आला आहे. असे बोलले जाते. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन जवळपास चार हजार पानांचा अहवाल तयार केला होता. सरकारी गोदामातील धान्य कशाप्रकारे इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीमध्ये येत होते आणि त्याची कशा पध्दतीने विल्हेवाट लावली जात होती याचे सादरीकरण देखील त्यांनी केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल सादर करुन या प्रकरणात दिशाभूल केली होती हे विशेष.