शिधावाटप खात्यातील पदे कमी करण्याविरोधात कर्मचारी आक्रमक

307
strike

शिधावाटप खात्यातील पदे कमी करण्याच्या विरोधात शिधावाटप कर्मचाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून काळ्या फिती लावण्यापासून निदर्शने करण्यापर्यंतची आंदोलने पुकारली; पण राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने या कर्मचाऱयांच्या मागण्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यामुळे शिधावाटप खात्यातील कर्मचारी अखेर रस्त्यावर उतरले असून उद्या मंगळवारी शिधावाटप कर्मचारी आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत.

मुंबई व ठाण्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच शिधावाटप खात्यातील कर्मचाऱयांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कामाच्या वाढत्या ताणाबरोबरच कर्मचारी संख्या वाढवण्याऐवजी कर्मचाऱयांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पदे कमी करण्यात येऊ नयेत या प्रमुख मागणीसाठी मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरली आहे. मुंबई व ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेतील कर्मचाऱयांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे.

शिधावाटप खात्यात वेतन आयोग लागू झाला तेव्हा ठरावीक टक्के पदे कमी होतात. राज्य सरकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा सर्व सरकारी विभागांतील तीस टक्के पदे कमी करण्याबाबत 2016 मध्ये जीआर जारी करण्यात आला होता. त्यानुसार शिधावाटप खात्यातील दोनशे पदे कमी होणार होती.

या खात्यातील 576 पदे कमी करण्याच्या हालचाली झाल्या पण कर्मचारी 576 संघटनेने पदे कमी करण्यास विरोध केला. मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱयांनी मागील आठवडय़ात काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर मुख्य शिधावाटप कार्यालय तसेच सर्व शिधावाटप कार्यालयांसमोर कर्मचाऱयांनी तीव्र निदर्शन केली पण राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने शिधावाटप कर्मचाऱयांकडे लक्ष देण्यास सरकारी यंत्रणाच नाही. अखेर शिधावाटप कर्मचाऱयांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून 19 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शिधावाटप कर्मचारी व अधिकारी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या