
शिमगोत्सवासाठी कंटेन्मेंट झोनमधून कुणी येत असेल तर त्यांनी 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा ॲंटीजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरून जर येत असाल तर ग्रामकृतीदल गावच्या ठिकाणी आपले स्क्रिनिंग करून तपासणी करतील. तपासणीत जर कोणती लक्षणे आढळल्यास पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. कोणतीही लक्षणे आढळली नाही तर तुम्ही शिमगोत्सवात सहभागी होऊ शकता, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिमगोत्सव साधेपणाने साजरा करा. गर्दी टाळा,प्रसाद वाटप टाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी पालखी नाचवू नका. तसेच जिल्ह्याबाहेरून रत्नागिरीत येणाऱ्या लोकांनी शक्यतो गावी येणे टाळा. गरज असेल तरच गावी या असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. शिमगोत्सवात 25 ते 50 जणांपेक्षा अधिक गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे त्यांनी सांगितले.
पालखी खेळवणार नाही; भैरी देवस्थानचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वबूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत श्री देव भैरीबुवा देवस्थानने यंदाचा शिमगोत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला. देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी सांगितले की, श्री देव भैरीची पालखी ज्या मार्गाने प्रदक्षिणा घेते, त्यामार्गावरून पालखी रथातून प्रदक्षिणा करेल. ढोलताशेही टेम्पोतून वाजवत नेणार आहोत. ज्या परिसरात रथ जाणार नाही, त्याठिकाणी पालखी खांद्यावरून नेण्यात येईल. शिमगोत्सव ते रंगपंचमीपर्यंत ग्रामदक्षिणा व सहाणेवर कोठेही पालखी खेळवली जाणार नाही, असे सुर्वे यांनी स्पष्ट केले.



























































