प्रतिस्पर्धी कोणीही असो, त्याला धूळ चारुन विजयाची हॅटट्रीक करायचीच, रत्नागिरी मतदार संघातील बैठकांमध्ये शिवसैनिकांचा निर्धार

लोकसभा निवडणूकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात प्रतिस्पर्धी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असू दे त्याची पर्वा न करता प्रतिस्पर्ध्याला निवडणूकीत धूळ चारायचीच आणि विजयाची हॅटट्रीक साधायची असा निर्धार रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी केला. आज रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील जिल्हापरिषद गटनिहाय आणि रत्नागिरी शहर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले.

खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आज रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील बैठका पार पडल्या. त्यामध्ये नाचणे जि.प. गट, हरचेरी जि.प.गट, मिरजोळे जि. प.गट, करबुडे जि.प.गट, शिरगाव जि. प.गट, वाटद जि.प.गट, गोळप जि.प. गट, पावस जि.प.गट, हातखंबा जि.प. गट आणि त्यानंतर रत्नागिरी शहराची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक प्रचारामध्ये कशाप्रकारे काळजी घ्यावी, कशी यंत्रणा राबवावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

सर्व जि.प.गटातून तसेच रत्नागिरी शहरातून उमेदवार खासदार विनायक राऊत यांना प्रचंड मताधिक्क्य देण्याचा निर्धार करण्यात आला. प्रतिस्पर्धी उमेदवार कमळ चिन्हावर असो किंवा धनुष्यबाण चिन्हावर असो, प्रतिस्पर्ध्याला धूळ चारुन विजयाची हॅटट्रीक करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. गावागावात प्रचार यंत्रणा राबवण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची असून जोमाने कामाला लागूया, विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हा संघटक वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, ममता जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.