रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1 टक्क्यावरून 6 टक्क्यांवर, लॉकडाऊनची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर आपण नियमांचे पालन केले नाही, काळजी, घेतली नाही तर आपला जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ शकतो, अशी भिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व व्यापारी संघटना आणि इतर सर्व संघटनांशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन किंवा निर्बंध जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 1 टक्क्यावरून 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सध्या असलेल्या यंत्रणेबाबतचा आढावा त्यांनी सांगितला. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जमावबंदीचे पालन कडक करावे, अशा सूचना पोलीसांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले. मास्क नसलेल्यांना 500 रुपयांचा दंड अधिक वाटत असल्याने आज रात्रीपासून 300 रुपयांचा दंड वसूल केला जाईल. आजपासून मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरीकांनी मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आठवडाबाजारमध्ये मास्क वापरला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन मास्क वापराबाबत कडक कारवाई करणार आहे. सूचना देऊनही कोरोना नियमांचे पालन झाले नाही तर आठवडाबाजार नाईलाजाने बंद करावे लागतील असा इशारा उदय सामंत यांनी दिला. शाळा, महाविद्यालयांच्याबाबतही उद्या निर्णय होणार आहे. तसेच किती कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे लागेल याबाबतचा निर्णयही उद्या जाहीर होईल, असे सामंत यांनी सांगितले. 10 जानेवारीपासून जिल्ह्यात बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली जाणार आहे.