गणपती बाप्पा मोरया! रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणपती

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाजत-गाजत उद्या मंगळवारी बाप्पाचे आगमन होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.घरगुती गणेशोत्सवाची मोठी परंपरा कोकणाला लाभली आहे.उद्या सकाळी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होऊन प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.गणेशभक्तांनी बनवलेल्या मखरात बाप्पा विराजमान होणार आहेत.उद्या मंगळवारी वादक-गाजत मिरवणूकीने गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.रत्नागिरी शहरातून निघणारी कर्ला-आंबेशेतची गणपती आगमन मिरवणूक लक्षवेधी असते.गेली 38 वर्ष हि आगमन मिरवणूकीची परंपरा जपली गेली आहे.

गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी घरे सजली आहेत.काही ठिकाणी इको फ्रेंडली सजावट करण्यात आली.गणपती सजावटीच्या स्पर्धा हि आयोजित करण्यात आल्या आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जय्यत तयारी करताना विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.जिल्ह्यात 126 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी 86 पोलीस अधिकारी, 1271 पोलीस अंमलदार,आरसीएफ पथक,एसआरपीएफ पथक, 108 मोटर सायकल आणि 96 चारचाकी वाहनांसह पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.मुंबई-गोवा महामार्गावर तीन तपासणी नाके आणि 15 मदत कक्ष तैनात आहेत.

3100 बस तर 313 रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या

घरच्या गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांना घेऊन एसटीच्या तब्बल 3100 बस आल्या आहेत तर कोकण रेल्वेने नियमित गाड्यांसह जादा गाड्यांच्या 313 फेऱ्या सोडल्या आहेत.