रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा! सीएनजी पंपाबाहेर रांगा, रिक्षा व्यावसायिकांना मोठा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्याने सीएनजी पंपाबाहेर वाहनाच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्याला आवश्यक त्या प्रमाणात सीएएनजी मिळत नसल्याने हे परिस्थिती उद्भवली असून याचा फटका सीएनजी वाहनधारकांना बसतो आहे.

रिक्षा व्यावसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना सीएनजी मिळविण्यासाठी अनेक तास रांगेत तिष्ठावे लागत असल्याने रिक्षा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना पेट्रोल किंवा डिझेलवर वाहने चालविणे आता शक्य राहिलेले नाही. यावर सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात अनेकांनी पेट्रोल डिझेलच्या गाड्या विकून सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या खरेदी केल्या तरी काहीजणांनी आपल्या जुन्या गाडयांना सीएनजी किट बसवून घेतले.

सुरुवातीला जेव्हा जिल्ह्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी होती, तेव्हा सीएनजी पंपावर सहज सीएनजी उपलब्ध होत होता. मात्र, आता नेमकी उलटी स्थिती झाली आहे. आता जिल्ह्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या कितीतरी झाली आहेत तर जिल्ह्याला मिळणार सीएनजीचा कोठा कमी झाला आहे. परिणामी सीएनजी मिळवताना सीएनजी वाहन धारकांना तासन्तास पंपाबाहेर रांगेत उभे रहावे लागत आहे. सीएनजी भरण्यावरून आपापसात शाब्दिक वादावादी होऊन त्यांचे पर्यवसान हाणामारीत होऊ लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात कळंबणी, लवेल आणि लोटे असे तीन सीएनजी पंप आहेत. मात्र या पंपांवर नेहमीचीच सीएनजीसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सीएनजीची गाडी जर सकाळी सात वाजता येणार असेल तर वाहनधारक पहाटे 3 वाजल्यापासूनच पंपावर लाइन लावून असतात. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना कोणत्या समस्येतून जावे लागते आहे, याची प्रचिती येते. जर रांगेत उभे राहिले नाही तर सीएनजी मिळत नाही आणि सीएनजी मिळाले नाही, तर पेट्रोलशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सीएनजी वाहनधारक हैराण झाले आहेत.

सीएनजी तुटवड्याचा सगळ्यात मोठा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसतो आहे. सीएजनी पेट्रोल डिझेलच्या तुलनेत स्वस्त असल्याने अनेक रिक्षा व्यावसायिकांनी पेट्रोलच्या रिक्शा विकून सीएनजी रिक्षा घेतल्या आहेत. यासाठी बँकांचे कर्ज काढले आहे. रिक्षा व्यवसाय करून बँकांचे कर्ज फेडायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा हा रिक्षा व्यावसायिकांचा मानस आहे. त्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करण्याशी तयार आहेत मात्र ज्या इंधनावर रिक्षा चालते ते इंधनच मुबलक स्वरूपात मिळत नसल्याने रिक्षा व्यावसायिकांची चांगलीच गोची झाली आहे. सीएनजी पंपाबाहेर लागलेल्या रांगेत रिक्षा व्यवसायिकांचे अनेक तास फुकट जात असल्याने रिक्षा व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी वाहनांची असलेली संख्या आणि जिल्ह्याला मिळणारा सीएनजीचा कोठा यामध्ये मोठी तफावत असल्याने येथील सीएनजी वाहन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे,. मुंबई, पुणे येथून येणारे पर्यटक हे देखील सीएनजीवर चालणारे वाहने घेऊन येत असल्याने सीएनजी पंपावरील गर्दीत आणखीनच भर पडत आहे. सीएनजी वाहन धारकांची अडचण लक्षात घेत रत्नागिरीतील सीएनजी पंपावर मुबलक प्रमाणात सीएनजी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सीएनजी वाहनधारकांमधून होत आहे.