रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, 3 नगरपरिषदा आणि 31 धोकादायक गावांना अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार 10 आणि 11 जूनला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. सुमारे 200 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाय योजना हाती घेतल्या असून पुरप्रवण क्षेत्रातील आणि दरड प्रवण क्षेत्रातील नागरीकांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. दोन दिवस जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार असून काही धोकादायक पुलांवरील आणि मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची दोन पथके तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली़.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. त्याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, अतिमुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. पूरप्रवण क्षेत्रातील नागरीकांचे स्थलांतरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 31 गावांना दरडीचा धोका असल्यामुळे त्या गावातील नागरीकांचेही स्थलांतरण केले जाईल़. अतिवृष्टीच्या काळात समुद्राच्या लाटा दाभोळ, हर्णै, आंजर्ले परिसरात उसळण्याची शक्यता आहे़. त्या भागात सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत़. नागरिकांबरोबरच जनावरांचेही स्थलांतरण करण्यात येणार आहे़. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंडये हे सुध्दा कोकण रेल्वे मार्गावर लक्ष ठेवून आहेत. कोकण रेल्वे मार्गावरही दरडी कोसळण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यास त्याच्या आधीच्या रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी थांबवून पुढे बसने प्रवास करण्याची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या 5 फायबर बोटी तसेच नगरपरिषदेनेही बोटींचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. अतिमुसळधार पावसात कोविड केअर सेंटरमधील वीजपुरवठा खंडित होऊ नये याकरीता उपाययोजना करण्यात आल्या असून ऑक्सीजनचाही बफरसाठा करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. मासेमारी बंद असताना जे मच्छिमार अजूनही समुद्रात मासेमारी करत आहेत त्यांच्यावर पोलीस, मत्स्य व्यवसाय आयुक्त आणि तटरक्षक दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे़. या काळात कोणीही समुद्रात मासेमारीकरीता जाऊ नये असे आवाहन मिश्रा यांनी केले. अतिमुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये रेशन आणि अन्य साहित्याचा पुरवठा केला जाईल. पावसानंतर रोगराई पसरण्याचा धोका असल्याने त्याप्रकारच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.

पुराचा धोका असलेली शहर आणि गावे

जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पूर प्रवण क्षेत्र जाहीर केले आहे़. त्यामध्ये राजापूर तालुका – राजापूर बाजारपेठ, काजीलडा, डोंगर, बांगरी खुर्द, भाबलेवाडी, संगमेश्वर तालुका – साखरपा, कसबा, कुरधंडा, नावडी, म्हासळे, वाशी तर्फे संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी़ रत्नागिरी तालुका – सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभ्ये. चिपळूण तालुका – पेठमाप, गोवळकोट, मजरेकाझी, खेर्डी आणि चिपळूण शहऱ. खेड तालुका – खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, अलसुरे. गुहागर तालुका – वडद, पालशेत, परचुरी या गावांचा समावेश आहे.

दरडीचा धोका असलेली गावे

दरडीचा धोका असलेली गावे ही जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत़. त्यामध्ये चिपळूण, गोवळकोट, पायरवाडी़ खेड – उंबरवाडी, कोतवली, बौध्दवाडी, गण्याचा टोप, चिंटेवाडी, मोरेवाडी-जामगे, कोसंबवाडी-मांडवे, नायतवाडी, तिवरे, निवेवाडी, गवळीवाडी़. संगमेश्वर – ताम्हाणे, मांजरे देसाईवाडी, कोळंबे, आंबवकरवाडी, देवळे, शेलारवाडी, मानसकोंड, कातुर्डे, नारजुवे-मधली वाडी, गवळीवाडी़. लांजा – मुसळेवाडी-खोरनिनको, साईबाबानगर-खोरनिनको, देवळीवाडी, गुरववाडी-हर्दखळे, कुरम. दापोली – पाजपंढरी, हर्णै – राजेवाडी, आंबवली खुर्द, धाकटीवाडी, तेलीवाडी, कर्दे, आसूद, कडूवाडी, मोरेवाडी, शिगवणवाडी. रत्नागिरी – साठरे, भुईवाडी, जांभारी. राजापूर – धोपेश्वर, शिवणे बुद्रुक या गावांचा समावेश आहे.

रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट

कुलाबा हवामान खात्याकंडून 10 आणि 11 जून रोजी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.