
पूर्वी ७० टक्के संगमेश्वरी बोली बोलली जात होती, आता मात्र तिचा अस्त होत आहे.आज काही तरुण पुढे येत असून समाज माध्यमांचा वापर करत आपली बोली सर्वदूर पोचवत आहे. यामुळे आगरी, मालवणी आजही तग धरून आहे; मात्र यात आपली संगमेश्वरी बोली कुठेय, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक आणि संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक अरूण इंगवले यांनी उपस्थित केला. ते नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित परिसंवादात बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) यांच्या अनुदानातून आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन घेण्यात आले. यात दुपारच्या सत्रात आयोजित केलेल्या या परिसंवादात भाषा अभ्यासक अरुण इंगवले, संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आणि पत्रकार अमोल पालये, गोवा येथील बोलीभाषा अभ्यासक प्रा. सारिका अडविलकर सहभाग घेतला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान मराठी, बोलीभाषा अभ्यासक प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी भूषविले.
अरुण इंगवले यांनी एकच शब्दाला बोलीभाषेत किती समानार्थी शब्द असू शकतात याची माहिती काही उदाहरणे देऊन दिली. वैभव मांगले, प्रभाकर मोरे यांच्या सारखे कलाकार संगमेश्वरी बोली पुढे घेऊन जात आहेत, असे सांगितले. अमोल पालये यांनी संगमेश्वरी बोलीचे महत्त्व विषद करताना जाखडी, नमन यांची उदाहरणे दिली. तर गोवा येथील प्रा. सारिका आडविलकर कोकणी (मुस्लिम) भाषेची माहिती दिली. किनारपट्टीवरील विशेषतः रत्नागिरीतील खाडीपट्ट्यात मुस्लिम, दालदी समाज कोकणी भाषा बोलत असून, ती खाली दक्षिणकडेही काही ठिकाणी बोलली जात असल्याचे सांगितले.
परिसंवादाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी भाषेची श्रीमंती असते आणि ती मुक्त पद्धतीने उधळता येते आजच्या पिढीला कळायला हवे, असे मत व्यक्त केले. त्यासाठी आपण माणसांची परिस्थितीशी तिथल्या संस्कृतीशी जोडले जाणे गरजेचे आहे. आभासी वावरण्यापेक्षा समाजात मिसळू आणि जाणून घेऊ तेव्हाच आपण अधिकाधिक संपन्न होऊ, असे त्या म्हणाल्या. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर जाधव यांनी केले. बदउज्जमा खावर सभागृहात झालेल्या या परिसंवादाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांच्यासह विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































