रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

711

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका शनिवारी जाहीर झाल्या़ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघामध्ये 21 ऑक्टोबर रोजी 13,08,800 मतदार आपला हक्कं बजावतील. त्यामध्ये 6,26,906 पुरुष आणि 6,81,884 महिला मतदारांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल याकरीता जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदार संघात निवडणूक होणार आहे. आजपासून आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आचारसंहितेच्या काळात राज्यसरकारचे कोणतेही कल्याणकारी कार्यक्रम होणार नाहीत. ज्या ठिकाणी फलक लावले आहेत ते सर्व फलक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1703 मतदान केंद्रे असणार आहेत, त्यापैकी काही मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये तर काही मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. दापोली विधानसभा मतदार संघात 7 मतदान केंद्राच्या स्थळात तर 4 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. गुहागरमध्ये एका मतदान केंद्राचे नाव बदलण्यात आले आहे. चिपळूणमध्ये दोन मतदान केंद्रांची स्थळे आणि पाच मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये तीन मतदान केंद्रांची स्थळांमध्ये बदल करण्यात आला आहे. राजापूर मतदारसंघात एका मतदार संघाच्या स्थळात बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.

पैशांच्या वाहतूकीवर करडी नजर – डॉ़ प्रवीण मुंढे
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणूक काळामध्ये पोलिसांकडून होणार्‍या कडक अंमलबजावणीबाबत माहिती दिली. निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या वाहतूकीवर करडी नजर ठेवली जाईल. तसेच अवैध दारुधंद्यांवर कारवाई केली जाईल. ज्या दोन मतदान केंद्रांवर दोन राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे. अशा मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असेल. विधानसभा निवडणूकं काळात काही ठिकाणी नाकाबंदी निश्चित करण्यात आली आहे. त्याठिकाणी आचारसंहितेचे कठोर पालन केले जाईल. आचारसंहितेच्या काळात सर्व शस्त्रपरवानाधारकांकडील शस्त्रे ताब्यात घेतली जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ़ प्रवीण मुंढे यांनी दिली.

सर्वाधिक मतदार रत्नागिरी मतदारसंघात
रत्नागिरी – 1 लाख 37 हजार 493 पुरुष आणि 1 लाख 44 हजार 085 महिला असून एकूण मतदार 2 लाख 81 हजार 587
दापोली- 1 लाख 33 हजार 200 पुरुष आणि 1 लाख 46 हजार 723 महिला मतदार असून, मतदार 2 लाख 79 हजार 924 मतदार
गुहागर – 1 लाख 12 हजार 880 पुरुष आणि 1 लाख 26 हजार 972 महिला, एकूण मतदार 2 लाख 39 हजार 852 मतदार
चिपळूण – 1 लाख 31 हजार 892 पुरुष आणि 1 लाख 37 हजार 826 महिला, एकूण मतदार 2 लाख 69 हजार 718 मतदार
राजापूर – 1 लाख 11 हजार 441 पुरुष आणि 1 लाख 26 हजार 278 महिला, एकूण मतदार 2 लाख 37 हजार 719 मतदार

आपली प्रतिक्रिया द्या