व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाना आलेल्या मालवण, देवगड येथील चार संशयित पोलिसांनी जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून 18 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियामद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास अनंत मेस्त्री (वय 48), समिर विठ्ठल तेली (वय 39), राजेश मोतीराम जगताप (वय 34) महेश मनोहर ठुकरुल (वय 48) अशी संशयितांची नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 6) रात्री आठच्या सुमारास साळवी स्टॉप ते मिऱ्याबंदर जाणाऱ्या रस्त्यावरील चंपक मैदान येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध अमली पदार्थ (गांजा) गुटखा विक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन, यावर अंकूश ठेवण्यासाठी पोलिस दलातर्फे मोहिम सुरु असून यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहे. शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातूनही अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना पोलिसांनी चार संशयित सापडले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटीसहीत 1 हजार किमतीचा बेसिक मोबाईल, 1 हजार 920 रुपयांची रोख रक्कम, 5 हजाराचा मोबाईल, दुसरा 5 हजाराचा मोबाईल असा 18 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. या प्रकरणी पोलिस अधिक्षक कार्यालयातील सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39, 44, 48, 49, (ब)57, 51 अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.