
आईनेच आपल्या तान्हुल्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. एक वर्षाच्या मुलीच्या तोंडात आईने कापसाचा बोळा कोंबल्याने तिचा घुसमटून मृत्यू झाला.
हुरेन असिफ नाईक (वय 1 वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत मुलीचे तर शाहीन आसिफ नाईक (35, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे. शाहीन हिने मुलीच्या तोंडात कापूस कोंबून तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे. मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारस नगर येथे वास्तव्यास होती. आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवल्याच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.