
उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर सही व शिक्का देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील केळशी सजाचे तलाठी राजेंद्र उंडे यांना मंगळवारी 10 जून 2025 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरीता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे यांच्याकडे 5 जुन रोजी 20 हजार रुपये मागितले होते. तलाठ्यांनी केलेल्या मागणीनुसार तक्रारदार 20 हजार रुपये घेऊन 10 जुन रोजी दुपारी 2.30 वाजता दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखलं झाले. यावेळी तलाठी भवन येथे तक्रारदाराने तलाठी राजेंद्र उंडे यांना पैसे दिले आणि याचवेळी पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी येथील पोलीस उपाधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, श्रेया विचारे, दीपक आंबेकर, कॉनस्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर, चालक प्रशांत कांबळे सहभागी झाले होते.