
सुप्रसिद्ध कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि आंजर्ले येथील समुद्र किनारा पाहण्यासाठी नेहमीच पर्यटक येत असतात. यामध्ये स्थानिकांचा सुद्धा समावेश असतो. असाच समुद्रकिनाऱ्यावर फेटफटका मारण्यासाठी आंजर्लेतील एकाच कुटुंबातील काही सदस्य आले होते. समुद्रात गाडी घालणे धोक्याचे आहे, हे माहित असूनही त्यांनी आपली कार समुद्र किनाऱ्यावर घातली आणि नंतर पाण्यात नेली. अखेर त्यांची कार पाण्यात बुडाली.
हुल्लडबाजी आली अंगलट; आंजर्ले येथील समुद्राच्या पाण्यात कार बुडाली#anjarlebeach #dapoli #ratnagiri pic.twitter.com/ZnraP3kfUU
— Saamana Online (@SaamanaOnline) November 5, 2025
पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाताना आपली चार चाकी वाहने ही आपल्या सुरक्षिततेसाठी समुद्र किनाऱ्यावर घेऊन जावू नये असे पर्यटक व्यवसायिकांकडून नेहमीच आणि सातत्याने सांगितले जाते. तरी सुद्धा काही पर्यटक हे स्थानिकांनी सांगितलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. आंजर्ले येथे वास्तव्याला असणारे काही जण आज (05 नोव्हेंबर 2025) संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी आले होते. पौर्णिमा असल्यामुळे पाण्याला नेहमी पेक्षा अधिक भरती होती. त्यामुळे समुद्राच्या पाण्याने किनारपट्टी व्यापली होती. अशी परिस्थिती असतानाही त्यांनी कार पाण्यात घातली आणि कार पुळणीच्या पाण्यात रुतली. भरतीचे पाणी वाढत गेले आणि कार पाण्यात बुडाली.































































