
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली कामे आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे येथील प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे.
त्यातच वाहतूक कोंडी ही एक नवीन समस्या बनून प्रवाशांचा मानसिक ताण वाढवत आहे. दररोज दुपारी आणि रात्री वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जवळपास दीड किमी अंतरापर्यंत वाहनांच्या दररोज रांगा लागतात, त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत .
महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने आणि रस्त्यावर सर्वत्र मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांची गती मंदावते या हलगर्जीपणामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी इतकी तीव्र असते की वाहनांची रांग जवळपास १ ते दोन किलोमीटर हून अधिक अंतरापर्यंत पसरलेली दिसून येते अनेकवेळा वाहने तासभर जागची हलत नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो.
या महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस उपस्थित नसल्याने वाहतूक कोंडी अधिकच बिकट होत आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. या सततच्या ट्रॅफिक जॅममुळे लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि राग वाढतो आहे. धकाधकीच्या जीवनात ट्रॅफिक जॅममुळे निर्माण होणारा हा मानसिक ताण नागरिकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे.
या गंभीर समस्येकडे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून महामार्गा वरील प्रवाशांना दिलासा मिळेल.



























































