
रत्नागिरी नगर परिषदमध्ये १६ प्रभागात ६९ मतदान केंद्रावर ६४ हजार ७४६ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ३१ हजार ३२४ पुरुष, ३३ हजार ४२१ महिला आणि १ इतर उमेदवार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी आज (11 नोव्हेंबर 2025) पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले की, जे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडून कुठे मतदान करणार याचे हमीपत्र घेऊन दुसऱ्या ठिकाणी दुबार म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करताना २६ नोव्हेंबरला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. दि.३० नोव्हेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुदत आहे. उमेदवाराने खासगी जागेत बॅनर लावल्यास त्या जागामालकाची आणि नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्या बॅनरचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज हे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भरून घेण्यात येणार आहेत. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी रत्नागिरी नगरपरिषदेमध्येच होणार आहे.
जात-धर्म आणि व्यक्तीगत टीकेवर आक्षेप प्रचार करताना उमेदवारांनी कुणाच्या व्यक्तीगत आयुष्यावर टीका करू नये. जात-धर्मांविषयी भावना भडकवणारी वक्तव्य करू नयेत, तशा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल असे जीवन देसाई यांनी सांगितले.
मतदान केंद्रावर वीज, पाणी, व्हिलचेअर आणि शौचालय अशा आवश्यक सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर एक आदर्श मतदान केंद्र, एक सर्व महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत असलेले मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचे जीवन देसाई यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते.






























































