
गणेशोत्सवानिमित्त चिपळूण नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनावर भर देत विशेष तयारी केली आहे. शहरातील 23 गणेश विसर्जन घाट परिसर व नद्यांचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी निर्माल्य संकलनाचा यशस्वी उपक्रम राबविला गेला आहे. त्यानुसार दीड दिवसांचे गणपती व गौरी-गणपती विसर्जनातून तब्बल 2 हजार 300 किलो निर्माल्य जमा झाले. या निर्माल्यातून सुमारे अडीच टन सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया युध्द पातळीवर सुरू झाली आहे.
नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर व कार्यालयीन अधिक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पालिकेतील आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव व त्यांच्या सर्व सहकारी टिमने चिपळूण शहरातील गणेश विसर्जन घाटांवर स्वच्छतेच्या दृष्टीने नीटनेटके नियोजन केले होते . गणेश विसर्जन दरम्यान परिसरात तसेच नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकले जाते. यामुळे तेथील परिसर व नदी प्रदूषित होते. याकडे विशेष लक्ष देऊन यंदाही गणेश विसर्जन घाटांबर ‘निर्माल्य कलश’ उपलब्ध करून देण्यात आले होते. या ठिकाणी कर्मचारीही तैनात करण्यात आले होते .
पालिकेच्या या उपक्रमाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली जबाबदारी निभावली. त्यांनी आपल्याकडील निर्माल्य या कलशात टाकून शहराच्या स्वच्छता चळवळीत आपलेही मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, गणेशोत्सवात आतापर्यंत जवळपास 2 हजार 300 किलो निर्माल्य या कलशांच्या माध्यमातून जमा झाले. आरोग्य विभागामार्फत या निर्माल्यापासून शिवाजी नगर येथील नगर पालिकेच्या घनकरचा व्यवस्थापन प्रकल्पात ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशिनद्वारे सेंद्रिय खत निर्मिती देखिल सुरू झाली आहे. आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी या प्रकल्पाला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
नगर पालिकेच्या सेंद्रिय खताला महासिटी हरित ब्रँड प्राप्त झाल्याने निर्माल्यापासून निर्माण होणाऱ्या खतालाही त्याचा चांगला फायदा होणार आहे. हे सेंद्रिय खत घरगुती व गार्डन वापरासाठी उत्तम असल्याने नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. चिपळूण नगर पालिकेचा हा उपक्रम केवळ शहराच्या स्वच्छतेसाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरत असून निर्माल्यापासून खत निर्मिती ही ‘कचन्यातून संसाधन’ करण्याची अनोखी संकल्पना यशस्वीपणे आकार घेत आहे.
कृत्रिम तलावात 366 गणेशमूतींचे विसर्जन
चिपळूण शहरातील काही गणेश विसर्जन घाट परिसरात यावर्षी सुध्दा कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्ती या तलावात विसर्जित करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले होते. गणेशभक्तांनीही या व्यवस्थेचे मनापासून स्वागत केले. तब्बल 366 गणेशमूर्ती या कृत्रित तलावात विसर्जित करण्यात आल्या. पालिका प्रशासनाने या गणेशभक्तांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. पुढील वर्षी कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जित करणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल, अशी अपेक्षाही भोसले यांनी व्यक्त केली आहे.
प्लास्टिकमुक्त चिपळूणकडे वाटचाल
प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी नगर पालिका प्रशासन जिकरीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम राबविले जात आहेत. सण-उत्सव काळातही चिपळूण शहर प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक कसे राहिल, यावर भर दिला जात आहे. या चळवळीला हळुहळू का होईना पण यश येताना दिसत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवातून त्याचे काहीसे सुखद चित्र दिसून आले. गणेशभक्तांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर टाळला. सजावटीसाठी नैसर्गिक वस्तू व पुनर्वापर करता येणारे साहित्य वापरण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे सांडपाणी व घनकचऱ्याचे प्रमाण कमी राहिले.