
राजापूर तालुक्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा अजब प्रकार समोर आला आहे. तळेवडे येथील एका ग्राहकाने मीटर बसवण्यासाठी चार महिने पाठपुरावा केला परंतु आजवर त्यांच्या घरी मीटर बसविण्यात आलेला नाही. परंतु मीटर बसवलेला नसतानाही महावितरणने त्यांना 740 रुपयांचे वीजबील पाठवलं आहे. त्यामुळे, “मीटरच नाही, तर बिल कसले?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलं आहे.
तळेवडे येथील दत्ताराम गुणाजी किंजलस्कर यांनी जुने घर मोडकळीस आल्याने काही महिन्यांपूर्वी नवीन घर बांधले. घर बांधल्यानंतर त्यांनी महावितरणच्या पाचल शाखेत नवीन मीटरसाठी अर्ज केला. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली तसेच ठरलेली फीही भरली. मात्र चार महिने पाठपुरावा करूनही त्यांच्या घरी मीटर बसविण्यात आलेले नाही. महावितरणच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारावर ग्राहक आधीच संतप्त असताना, मीटरच नसताना दत्ताराम किंजलस्कर यांच्या घरी तब्बल 740 रुपयांचे वीजबील धाडण्यात आले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. मीटर बसविण्याचे काम चार महिन्यांपासून रखडवून ग्राहकांच्या घरात बील पाठवणे हा बेजबाबदार कारभाराचा नमुना असून, महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचा प्रश्न एकच आहे जर, “मीटरच नाही, तर बिल कसले?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.