मॉब, खिळे आणि तयार कपडे मोजताना प्रशासनाची दमछाक, रत्नागिरीकरांना चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलच्या मालमत्तेवर जप्ती सुरू

कच्चा माल आम्ही देतो, पक्का माल बनवून द्या. त्या मालाची विक्री आम्ही करू, अशी जाहिरात करत रत्नागिरीकरांना ६ कोटी ३६ लाख ६० हजार १८२ रूपयांचा चुना लावणाऱ्या आर्जू टेक्सोल कंपनीची मालमत्ता जप्त करण्यास आजपासून (6 नोव्हेंबर 2025) सुरूवात झाली आहे. आर्जूच्या गोदामातील गुंतवणूकदारांनी तयार केलेले मॉब, खिळे, कपड्यासारख्या वस्तू मोजतानाच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे.

रत्नागिरी एमआयडीसी मध्ये आर्जू टेक्सोल कंपनी सुरू करण्यात आली होती. कच्चा मालापासून पक्का माल बनविण्याच्या जाहिराती करून त्यांनी लोकांना आकर्षित केले. त्यानंतर गुंतवणूकीच्या योजना सुरू केल्या. साडेपाचशेहून अधिक गुंतवणूकदारांनी आमिषाला बळी पडून गुंतवणूक केली. साडे सहा कोटी ३६ लाख ६० हजार १८२ रूपयांची गुंतवणूक केली. परतफेडीची वेळ आली तेव्हा संचालकांनी पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.

आर्जू टेक्सोल कंपनीच्या मालमत्तेची प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पहाणी केली. त्यांच्या गोदामात सभासदांकडून तयार केलेला माल आहे. या संपूर्ण मालाची मोजणी करण्यासाठी प्रशासनाला दोन-तीन दिवस लागणार आहेत.