Ratnagiri News – “माणसांसाठी No Parking गाढवांसाठी राखीव” पुणेरी नाही तर रत्नागिरीच्या या भन्नाट पाटीची होतीये चर्चा

पुणेरी पाट्यांची चर्चा सर्वत्र होत असते. परंतु आता पुणेरी पाट्यांना आव्हान देईल अशी एक पाटी रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरीत याच पाटीची जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. “शहाण्याला शब्दाचा मार” य म्हणीला अनुसरून ही पाटी लावण्यात आली आहे. सध्या रत्नागिरीत वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिक हैराण आहेत. कुणीही येतो आणि दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभे करून जातो. यामुळे वैतागलेल्या मंडळींनी ही भन्नाट पाटी लावली आहे.

रत्नागिरी शहरात मारूती मंदिर येथे नाचण्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ही पाटी पाहायला मिळते. पाटीवर ठळक अक्षरात “माणसांसाठी No Parking गाढवांसाठी राखीव” असं लिहिण्यात आलं आहे. एक प्रकारे साध्या आणि सरळ भाषेत त्या परिसरात गाडी उभी करणाऱ्यांचा न बोलता अपमान केला आहे. रत्नागिरीत सध्या कुठेही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना आता अशा मंडळींना शब्दाचा मार द्यावा लागत आहे. या भन्नाट आणि हटके पाटीची सध्या रत्नागिरीत चांगलीच चर्चा असून ही पाटी या मार्गाने प्रवास करणाऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.