Ratnagiri News – इंधन टंचाईच्या अफवेने दापोलीत पेट्रोल पंपांवर झुंबड; प्रशासनाच्या शांततेमुळे वाहनधारकांत संभ्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य दरवाढीच्या अफवांमुळे दापोली शहरासह परिसरात इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दापोलीतील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांमधील चिंतेत भर पडली आहे.

दापोली शहरात 4 आणि गिम्हवणे परिसरात 2 असे एकूण 6 पेट्रोल पंप आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पंपांवर इंधनाचा पुरवठा अनियमित होत आहे. काही पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ असे फलक झळकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याचाच परिणाम म्हणून, ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. विशेषतः तहसीलदार कार्यालयासमोरील भारत पेट्रोलियम पंपावर आज सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली.

दापोलीतील या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. जर खरंच इंधन टंचाई नसेल, तर प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर लगाम लावल्यास पंपांवरील ही अनावश्यक गर्दी कमी होऊ शकते.